
कराड : सार्वजनिक गणेशोत्सव काळात गोधळ करुन कायदा व सुव्यवस्था निर्माण करणाऱ्या, तसेच पोलीस अभिलेखावरील गुन्हे असलेल्या संशयित आरोपींना कराड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल 92 जणांवर पोलिसांनी उपविभागीय दंडाथिकारी कराड विभाग यांच्या सूचनेने तात्पुरत्या हद्दपारीची कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार यांनी रेकॉर्डवरील लोकांचे अभिलेख पडताळून त्यांच्यावर गणेशोत्सवात प्रतिबंधक कारवाई होण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविले होते. त्याअनुषंगाने गणेशोत्सवाचा अंतिम टप्प्यात विसर्जन कालावधीत कराड शहर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात प्रवेश व वास्तव्यबंदी करत शुक्रवार, दि. 13 रोजी उपविभागीय दंडाधिकारी यांनी सदर प्रस्तावास मंजुरी दिली आहे. त्यानुसार प्राप्त आदेशाची अंमलबजावणी करत कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकरटीकरण शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड यांच्या पथकाने तब्बल 92 जणांना कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतीन तात्पुरते हद्दपार केले आहे.
तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी शहरामध्ये 19 पोलीस अधिकारी, 169 पोलीस अंमलदार व 50 होमगार्ड असा बंदोबस्त नेमण्यात आला असून शहरामध्ये मिरवणूक मार्गावर 240 कॅमेरे, मुख्य मार्गावर 45 कॅमेरे ठेवण्यात आले आहेत. कोणीही कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास नागरिकांनी तात्काळ नजीकच्या पोलीस अंमलदार, अधिकारी यांना कळवावे. किंवा डायल 112 वर कॉल करण्याचे आवाहन केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय दंडाधिकारी अतुल म्हेत्र, पोलीस उप अधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश कड, पोलीस उपनिरीक्षक निखील मगदुम, पो. हवा. शशिकांत काळे, अमित पवार, अशोक वाडकर, सपना साळुंखे, पोलीस नाईक अनिल स्वामी, संदीप कुभार, पो. शि. आनंदा जाधव, धीरज कोरडे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, मोहसिन मोमिन, हर्ष सुखदेव, मोहसिन मोमिन, संग्राम पाटील, महिला पोलीस सोनाली पिसाळ यांनी केली.