
कराड : कराड तालुका खरेदी विक्री संघाने तालुक्यातील शेती व शेतकरी विकासासाठी भरीव असे योगदान दिले असल्याचे प्रतिपादन रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अँड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी केले.
कराड तालुका सहकारी खरेदी लि, कराड ची 87 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन अनिलराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी सभेस रयत सहकारी साखर कारखान्याची व्हा. चेअरमन आप्पासाहेब गरुड, कोयना दूध संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई, ज्येष्ठ नेते वसंतराव जगदाळे, कोयना सहकारी बँकेचे चेअरमन रोहित पाटील, कराड बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, प्रा. धनाजी काटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, शामराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन शहाजी शेवाळे, चार्टर्ड अकाउंटंट तानाजी जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ॲड. उदयसिंह पाटील पुढे म्हणाले, कराड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाने तालुक्यातील शेतकऱ्यांना खते, बी- बियाणे डिझेल व शेतीपूरक लागणारे फिनोलेक्स पाईप व औजारे तसेच आधुनिक तंत्रज्ञान मापक दराने उपलब्ध करून दिलेले आहे संस्थेने व्यवसायामधील नफा न पाहता शेतकऱ्यांना अल्प नफ्यामध्ये सेवा देण्याचे काम केलेले असून शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा नवीन बी- बियाणे वापरून शेतीकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उद्योग म्हणून पहावे असे आवाहन त्यांनी केले.
अनिल मोहिते म्हणाले, कराड खरेदी विक्री संघाच्या हेड ऑफिस व एकूण 25 शाखा/विभागामार्फत ग्राहकांना सेवा पूरविली जाते. संघाकडे स्थावर व जंगम मालमत्ता रुपये 2 कोटी 86 लाख आहे. संघाचे खेळते भांडवल रुपये 10 कोटी 59 लाख एवढे आहे. गतवर्षी कमी पर्जन्यमानामुळे शेती व्यवसाय अडचणीत असताना संस्थेने सर्व शाखा विभागातुन शेतक-यांना सेवा पूरविलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये सुध्दा संस्थेने रुपये 72 कोटी 06 लाखाची उलाढाल केली आहे. त्यातून व्यापारी नफा रुपये 1 कोटी 85 लाख एवढा झालेला असून सर्व तरतूदी वजा जाता संस्थेस निव्वळ नफा रक्कम रुपये 12 लाख 15 हजार एवढा झालेला आहे. संस्थेस सतत ऑडीट वर्ग “अ” मिळालेला आहे.
संस्थेने नामांकित कंपनीची खते, बि-बियाणे, पत्रा पाईप, शेती औषधे, पशुखाद्य, शेती औजारे यासह सेवा पुरवण्याचे काम सुरु आहे. मार्केट यार्ड येथील खुल्या जागेमध्ये स्व. लोकनेते विलासकाका पाटील (उंडाळकर) यांचे नावांने व्यापारी संकुलन उभारणीचे काम प्रगती पथावर आहे. यावर्षी संस्थेने संस्था सभासद व व्यक्तिगत सभासदांना 15 टक्के लाभांश देण्याचे जाहीर केलेले आहे. तसेच स्वर्गीय लोकनेते विलासकाका पाटील यांनी घालून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे कामकाज चालू असून संस्थेला ॲड उदयसिंह पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
श्रद्धांजली ठराव संचालक प्रताप कणसे यांनी मांडला. व्हा. चेअरमन जगन्नाथ मोरे यांनी आभार मानले. सभेचे नोटीस वाचन सरवस्थापक शशिकांत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र जाधव यांनी केले. सभेस ज्येष्ठ संचालक हनुमंतराव चव्हाण, यशवंत बँकेचे चेअरमन महेशकुमार जाधव, बाळासाहेब जाधव, माजी सभापती प्रदीप पाटील, संपतराव इंगवले, मोहनराव माने, उध्दवराव फाळके, बाजार समितीचे उसभापती संभाजी काकडे, कराड संघाचे संचालक, संस्था प्रतिनिधी सभासद शेतकरी उपस्थित होते.