
कराड : कराड शहरात हद्दवाढ झालेल्या भागातील रहिवाशांनी कराड मुख्याधिकाऱ्यांच्या दालना बाहेर आंदोलनाचा पवित्रा घेतला. हा भाग जवळपास पंधरा वर्षे होऊन अधिक काळापासून कराड नगर परिषदेत समाविष्ट झालेला असून या भागाला अद्याप पर्यंत ऍप्रोच रस्ता मिळालेला नाही त्यामुळे या भागातील रहिवाशांना मोठ्या कसरतीने या भागात ये-जा करावी लागते. अनेक वेळा या भागातील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे रस्त्याची मागणी केली. मात्र नगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज त्या भागातील रहिवाशांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालना बाहेर आंदोलन केलं.
यावेळी रहिवाशांनी या भागात रस्त्याची सुविधा नसल्याने घरी पाहुणे सुद्धा येत नसल्याचे सांगितले. तसेच लाईटची सुविधा नसल्याने महिला वर्ग रात्रीच्या वेळेस या भागात ये-जा करू शकत नाही. सुरक्षेची सुद्धा या ठिकाणी वाणवा असल्याचे सांगितले. वाडीव भागातील रहिवाशांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मुख्याधिकारी परगावी असल्याने त्यांच्या वतीने नगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारला. वाढीव भागातील नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्याचबरोबर उद्या पुन्हा मुख्याधिकाऱ्यांना भेटण्यासाठी येण्याची पालिका अधिकारी यांनी विनंती केली. यावर आंदोलनकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांनी आमच्या परिसरामध्ये येऊन रस्त्याची अवस्था पाहण्याची मागणी केली. तूर्तास तरी ते आंदोलन थांबलेले असले तरी येणाऱ्या काळात अप्रोच रस्ता मिळाला नाही तर या भागातील नागरिक आक्रमक होण्याची शक्यता या आंदोलनामुळे निर्माण झाली आहे.
यावेळी या आंदोलनात त्या भागातील नागरिकांनी मोठा सहभाग घेतलेला होता.