
कराड ः वडगाव हवेली ता. कराड गावच्या हद्दीत डंपर व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. सदरचा अपघात गुरूवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास झाला.
दिलीप हनुमंत पवार (वय 44, रा. लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मयत दिलीप पवार हे शेणोली बाजूकडून कराडच्या दिशेने येत होते. तर डंपर हा कराडच्या बाजूने शेणोली बाजूकडे जात होता. गुरूवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वडगाव हवेली हद्दीत आल्यानंतर डंपर व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दुचाकीवरील दिलीप पवार यांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मयत झाले असल्याचे सांगितले. याप्रकरणी कराड तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.