
कराड : राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी आपलचं सरकार येणार असा दावा वेगवेगळ्या सर्व्हेच्या माध्यमातून करत आहे. पण, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढील दोन महिन्यात सत्ता परिवर्तनाचे संकेत दिले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज साताऱ्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी शरद पवार यांनी काले येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी संस्थेला 1 कोटी रूपयांची मदत जाहीर केली. तसंच, यावेळी बोलताना त्यांनी सत्ता परिवर्तन करण्याबद्दल संकेत दिले.
‘महाराष्ट्र सरकार त्यावेळी आम्हा लोकांच्या हातात होते. त्यावेळच्या आमच्या अर्थमंत्र्यांना आम्ही सूचना केली होती की, रयत शिक्षण संस्थेनं मोठं काम केलं. त्या संस्थेचा सन्मान केला पाहिजे, त्यासाठी निधी दिला पाहिजे. बजेटमध्ये घोषणा करावी, त्याप्रमाणे तरतूद केल्याप्रमाणे खर्च करावा. हा माझा सल्ला अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांनी मान्य केला. त्यानंतर आता ३ कोटींची रक्कम संस्थेकडून वर्ग केली आहे’ असा किस्साही शरद पवारांनी यावेळी सांगितलं.
तसंच, ‘पण ती झालेली सूची राज्य सरकारकडून येणे बाकी आहे. आता थोडी परिस्थिती बदलली की, दोन महिन्यात तुम्ही बदल करा, ही जी राहिलेली रक्कम आहे ती आम्ही संस्थेकडे वर्ग करून दाखवू, यासाठी तुम्हा सगळ्यांची मदत लागणार आहे’ असं म्हणत शरद पवारांनी राज्यात सत्तापरिवर्तन होणार असल्याचे संकेत शरद पवार यांनी दिले आहे.
दरम्यान, उद्या सोमवारी चिपळूणमध्ये काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार हे चिपळूण दौऱ्यावर येत असून संपूर्ण कोकणाचे लक्ष या सभेकडे लागले आहे. या सभेचा टिझर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने जाहीर केला आहे.
दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसमान यात्रा चिपळूणमध्ये झाली. त्याच धर्तीवर शरद पवार गटाची जाहीर सभा होणार आहे. या सभेचा टिझर जाहीर करण्यात आला असून उद्या शरद पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार शेखर निकम यांच्यासमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार उद्योजक प्रशांत यादव यांचे आव्हान राहणार आहे. तेच या जाहीर सभेचे आयोजक देखील आहेत.