महाराष्ट्रात १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान मतदान आणि २० नोव्हेंबरपर्यंत निकाल ?

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीची राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. युती आणि आघाडी यांच्यामध्ये जागावाटपावर चर्चा सुरु आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे १४ जणाचे पथक गुरुवारी रात्री दाखल झालेय. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आय़ुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वात १४ जणांचे पथक दाखल झालेय. हे पथक शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान मतदान आणि २० नोव्हेंबरपर्यंत निकाल असा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता निवडणूक कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
आयोगाचे अधिकारी आज सकाळी १० वाजता राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर दुपारी एक वाजता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी व नोडल ऑफिसर यांची बैठक होणार आहे. दुपारी तीन वाजता गुप्तचर व विविध अंमलबजावणी संस्थांच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता राज्याचे मुख्य सचिव, राज्याचे पोलिस महानिरीक्षक, प्रशासकीय विभागाचे विविध सचिव आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
केंद्रीय निवडणूक पथकाची शनिवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि सर्व जिल्ह्यातील पोलिस आयुक्त, पोलिस अधिक्षक यांच्यासोबत बैठक आयोजिक करण्यात आली आहे. प्रशासकीय तयारी, पोलिस अधिकाऱ्यांकडून कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून माहिती, आढावा घेणार आहेत. त्यानंतर शनिवारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. शनिवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शनिवारी विधानसभा निवडणुकीची घोषणा केल्यास तेव्हापासूनच राज्यात आचारसंहिता लागू होईल.
राज्यातील आढावा घेतल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाची शनिवारी पत्रकार परिषद होणार आहे. त्यामध्ये निवडणुकीच्या तयारीसंदर्भात माहिती देण्यात येईल, असे समजतेय. राज्याचा दौरा करुन माघारी परतल्यानंतर आठ दिवसांत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात येईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. नवरात्रीमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणूक किती टप्प्यात होणार याबाबत सर्वच पक्षात उलट सुलट चर्चा ऐकण्यास मिळत आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी राज्यात दोन टप्प्यात निवडणुका होतील, असा अंदाज वर्तवला होता. काही तज्ज्ञांच्या मते राज्यात विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात होतील.
२८८ विधानसभा मतदारसंघातील निवडणुका दोन टप्प्यात घेण्याचं ठरवल्यास १३ नोव्हेंबर आणि १६ नोव्हेंबर या दोन टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. तर २० नोव्हेंबर रोजी निवडणुकीच्या निकाल लागू शकतो. एकाच टप्प्यात निवडणुका घ्यावयाचे ठरल्यास १६ नोव्हेंबर रोजी मतदान होऊ शकते. तर २० नोव्हेंबर रोजी निकाल लागू शकतो.