राजकियराज्यसातारा

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार : आ. पृथ्वीराज चव्हाण

कोळेत सोसायटी इमारत उद्घाटन व कामांचे भूमिपूजन : भाजपला हद्दपार करण्याचे आवाहन

कराड : शिक्षण, शेती, उद्योग अणि नोकऱ्या या सर्वच क्षेत्रात मोदी सरकार पिछाडीवर आहे. देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. वर्ण व्यवस्थेवर आधारीत भाजप सरकारला हद्दपार करा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कोळे (ता. कराड) सेवा-सोसायटीच्या नूतन इमारतीचे उदघाटन व ग्रामनिधीतून विविध विकासकामांच्या भुमीपूजन  कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील – उंडाळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सहकारी संस्था उपनिबंधक संजय जाधव, अजितराव पाटील – चिखलीकर, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, माजी अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, युवा नेते इंद्रजित चव्हाण, कोयना सहकारी दूध संघाचे अध्यक्ष लक्ष्मण देसाई, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अनिल मोहिते, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी काकडे, कोयना बँकेचे अध्यक्ष रोहीत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, कराड पंचायत समितीचे माजी उपसभापती रमेश देशमुख,  प्रा. धनाजी काटकर, रयत सहकारी साखर कारखान्याचे संचालक रमेश चव्हाण, संचालिका रंजना पाटील, कोळेच्या सरपंच लतिफा फकीर, कृष्णत पाटील, विठ्ठल पाटील, सोसायटीचे अध्यक्ष शामराव पाटील, उपाध्यक्ष मंदार शिंगण यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे संचालक व कोळे विभागातील कार्यकर्ते उपस्थित होते.

आ. चव्हाण म्हणाले, सरकार चालवता येत नसलेल्या भाजपने सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य करण्याऐवजी गॅसचे दर वाढवले. डिझेल-पेट्रोलचे दर वाढवले. त्यातच शेतीमालाला भाव नाही. शेतकऱ्यांची पिळवणुक सुरू आहे. जरा कुठे दर वाढले की, शेतमालावर निर्यातबंदी धोरणामुळे शेतकरी अडचणीत आहे. युवकांना नोकऱ्या नाहीत. स्पर्धा परिक्षा पुढे ढकलल्या जात आहेत. महागाईने सर्वसामान्याचे कंबरडे मोडले आहे. भाजप सरकार विरोधात जनसामान्यात आक्रोश असून, महाविकास आघाडीला जनतेतून मोठा प्रतिसाद आहे. यावेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीचे सरकार येणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत याचा ट्रेलर पाहयला मिळाला. जनतेने महाविकास आघाडीला स्वीकारले आहे, यावेळी परिवर्तन निश्चित आहे.

उदयसिंह पाटील म्हणाले, काँग्रेसच्या विचारधारेवर चालणारा मतदारसंघ आहे. विलासकाकांनी ३५ वर्षे मतदारसंघाची मोट बांधली. विरोधक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. व्यक्तीगत स्वार्थासाठी बुध्दीभेद करून तुमचा वापर करत आहेत, याचा विचार तुम्ही करा. उज्वल भविष्यासाठी सरंमजामशाही प्रवृत्तीला वेळीच जागा दाखवा. महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या विचारधारेच्या पाठिशी रहा. यावेळी मुनीर बोजगर यांची कराड दक्षिण काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या उपाध्यक्षपदी व मन्सूर मुजावर यांची कराड दक्षिण काँग्रेस सेवादलच्या उपाध्यक्षपदी निवड झालेबद्दल त्यांचा आ. चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राजेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. डी. आर. पाटील यांनी आभार मानले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close