आम्ही सत्तेत आल्यानंतर लडकी बहीण योजना बंद करणार नसून याउलट त्याचे पैसे वाढवून देणार : नाना पटोले

मुंबई : महायुती सरकारने सुरू केलेली ‘माझी लाडकी बहीण योजना’ महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर बंद होणार असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोणताही आडपडदा न ठेवता थेट भाष्य केले आहे.
आगामी धोरणावर चर्चा घडवून आणणाऱ्या ‘अजेंडा महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यातील राज्याच्या राजकारणातील सौहार्द संपलंय का? या चर्चासत्रात नाना पटोले सहभागी झाले होते. यामध्ये नाना यांनी मविआतील जागा वाटपापासून ते विविध राजकीय मुद्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. आमचं सरकार असताना सोयाबीनला 6 हजाराचा दर होता. तर, आता या सरकारच्या काळात 4 हजारही दर नसल्याचे त्यांनी सांगितले. सत्ताधारी राज्याच्या तिजोरीची लूट करत असून जनतेचा पैसा लुटला जात असल्याचा बोचरा वार पटोले यांनी केला. महायुतीचे सरकार महाराष्ट्राच्या खुर्चीवर बसून गुजरातचा विकास करतात. आता हे आम्ही होऊ देणार नसल्याचेही नाना पटोले यांनी म्हटले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तेवर आमचं सरकार येणार ही काळया दगडावरची रेघ आहे. नितीन गडकरींनी राज्याची आर्थिक स्थिती सांगितली आहे. कर्नाटकमध्ये आम्ही कुठल्याही योजना बंद करून महिलांना पैसे देत नसल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले. सध्याचे राज्यातील महायुतीचे सरकार हे इतर योजनांचे पैसे माझी लाडकी बहीण योजनेसाठी देत असल्याचा दावा त्यांनी केला. संजय गांधी निराधार योजनेचे पैसे गरजू लाभार्थ्यांना मिळत आहेत का, असा प्रश्नही त्यांनी केला. आम्ही सत्तेत आल्यानंतर ही योजना बंद करणार नसून याउलट त्याचे पैसे वाढवून देणार असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. जनतेचे पैसे हे जनतेला मिळायला हवे असेही त्यांनी सांगितले.