
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरीमाराजे छत्रपती यांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे मोठा गोंधळ पाहण्यास मिळाला. आज महायुतीच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सतेज पाटील यांच्यावर सडकून टीका केली.
‘विरोधी पक्षामध्ये असताना तुम्हाला इतकी मस्ती आली आहे का, की अशा प्रकारे वागताय. तुम्हाला काही जणांची नाहीतर मनाची लाज आहे की नाही’ असं म्हणत अजितदादांनी सतेज पाटलांचं नाव न घेता टीका केली.
आज कोल्हापूरमध्ये महायुतीची सभा पार पडली. या सभेत महायुतीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यावेळी बोलताना अजित पवार यांनी कोल्हापूरमधील घडलेल्या मधुरीमाराजे माघारी नाट्यावर भाष्य केलं.
‘काल या कोल्हापूरनगरीमध्ये काय घडलं. कुणी कुणाचा अपमान केला. त्या गादीचा अपमान करण्याचा अधिकार कुणी दिला. विरोधी पक्षामध्ये असताना तुम्हाला इतकी मस्ती आली आहे का, की अशा प्रकारे वागताय. तुम्हाला काही जणांची नाहीतर मनाची लाज आहे की नाही. हे अजिबात महाराष्ट्र खपवून घेणार नाही’ असं म्हणत अजितदादांनी सतेज पाटलांवर टीका केली.
तसंच, कोल्हापूरची गादी, साताऱ्याची गादी याला महाराष्ट्रामध्ये मान आहे. ही आपली परंपरा आहे, ही आपली संस्कृती आहे. त्यांचा सन्मान राखला पाहिजे, असंही अजित पवारांनी बजावलं.
गेली 35 वर्षे मी राजकारणात काम करतोय. निर्णयाच्या बाबतीत कोणालाही महायुतीने वंचित ठेवलेले नाही. तगडे उमेदवार, सोशल इंजिनिअर साधण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. आमच्यात चांगला समन्वय ठेऊन प्रश्न हाताळले. लोकसभेच्या त्रुटी सुधारण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. पाऊस चांगला आहे. मोदींचे सरकार आले आहे. आम्ही चांगले निर्णय घेतले आहे कोल्हापूरसाठी जे मागितले ते दिले, असंही अजितदादा म्हणाले.
‘अंबाबाई जोतिबा देवस्थानासाठी मदत केली. केशवराव भोसले नाट्यगृहाला मदत केली. पाणी शेती यावर सरकारने लक्ष दिले आहे. फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न लोकसभेला झाला. उलट न्यायदेवतेचे डोळे सोडले आहे. तिच्या हातात संविधान दिले आहे. हे सरकार आपले उद्योग दुसऱ्या राज्यात पाठवता हा आरोप धादांत खोटा आहे. जगातील सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आहे, असा दावाही अजितदादांनी केला.