शिवसेना पक्ष आणि आमदार ‘सुप्रीम’ सुनावणी पुन्हा लांबणीवर?

दिल्ली : शिवसेना पक्ष अन् चिन्ह प्रकरणी निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय तसेच विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या निकालाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. मात्र सुप्रीम कोर्टातील या दोन्ही प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या म्हणजे 14 मे रोजी सुनावणी होणार होती. तर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्या प्रकरणी ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर 17 मे रोजी सुनावणी होणार होती.
मात्र आता या दोन्ही प्रकरणाच्या सुनावण्या पुन्हा पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता असून थेट जुलै महिन्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे ब्राझिल दौऱ्यावर जाणार असल्याने ते कामकाजात नसतील. या दोन्ही प्रकरणाच्या सुनावण्या CJI यांच्या पिठासमोर होत्या मात्र ते सुट्टीवर असल्याने या सुनावण्या होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल तसेच आमदार अपात्रतेचा निकाल हा राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारा आहे. परंतु मागच्या अनेक महिन्यांपासून शिवसेनेच्या सत्तासंघर्षाची सुनावणी झालेली नाही. त्यामुळ या प्रकरणाचा निकाल थेट विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लागण्याची शक्यता आहे.