
कराड ः नाकाबंदी दरम्यान शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातुन चोरीस गेलेली दुचाकीसह चालक पकडण्यात कराड शहर वाहतुक पोलिसांच्या कर्मचाऱ्यांना यश आले. याप्रकरणी वाहतुक पोलिसांनी दोन संशयीतांना ताब्यात घेवुन दुचाकीसह शिरोली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कराड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात वाहतुक पोलिस एन. डी. पाटील आणि ए. डी. मुळे हे कार्यरत होते. ते दुचाकींची तपासणी करत असताना त्यांनी एक दुचाकी थांबवली. पोलिसांनी चालकाला नाव विचारल्यावर त्याने अनिल हणमंतराव आखलवाडी (वय- १९ वर्षे रा. हमंतराया लवंगी, ता. बसवण-बागेवाडी, जि. विजापूर -कर्नाटक) आणि पाठीमागे बसलेल्याने सद्दाम शेख (वय १९, रा. गांधीनगर रेल्वे स्टेशन पलीकडे ता. करवीर जि. कोल्हापूर) असे सांगितले. पोलिसांनी संबंधित दुचाकीची कागदपत्रे मागितल्यावर संशयीतांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांना दुचाकीसह वाहतुक शाखेते नेण्यात आले. तेथे पोलिसांच्या अॅपवर माहिती घेतल्यावर ती गाडी शिरोली एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील असल्याची माहिती मिळाली. त्यावर संबंधित संशयीतांची आणि दुचाकीची माहिती शिरोली पोलिसांना देण्यात आली. दुचाकी चोरीची असल्याचे खात्री झालेने आज ती दुचाकी संशयीतांसह शिरोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक तुषार दोषी, अतिरीक्त पोलीस अधिक्षक वैशाली कडुकुर, पोलिस उपाधिक्षक अमोल ठाकूर, वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनखाली वाहतूक शाखेचे कर्मचारी के. ए. टिकोळे, एन. बी. सावंत, एम. डी. पाटील, ए. डी. मुळे यांनी केली.