
कराड : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे अमिष दाखवत हवाई दलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याला तब्बल १ कोटी १० लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी अन्य काहीजणांची फसवणूक केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
माधव मनोहर काळे (वय ६१, रा. शुक्रवार पेठ, कराड) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. किशोर अधिकराव पिसाळ (रा. करवडी, ता. कराड) व दीपक बाळकृष्ण यादव (रा. सोळशी, ता. कोरेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील माधव काळे हे हवाई दलातून सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्तीनंतर काही काळ त्यांनी खासगी कंपनीत नोकरी केली होती. जानेवारी २०२३ मध्ये त्यांची किशोर पिसाळ याच्याशी ओळख झाली. किशोर पिसाळ याने स्वत:ला सैन्यदलातून निवृत्त झाल्याचे सांगून विश्वास संपादन केला. तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची संधी असल्याचे सांगून दिपक यादव याच्याशी माधव काळे यांची ओळख करून दिली. दिपक यादव यानेही मी सैन्य दलातील सेवानिवृत्त अधिकारी आहे, असे माधव काळे यांना सांगीतले. तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मी महिन्याला ४ टक्केप्रमाणे वर्षाला ४८ टक्के परतावा देईन, असे अमिष दाखवले. संशयीतांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून माधव काळे यांनी वेळोवेळी एकूण १ कोटी १० लाख रुपये दिपक यादव याच्या बँक खात्यात वर्ग केले.
सुरूवातीला माधव काळे यांना संशयीतांनी काही रक्कम दिली. मात्र, त्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. संशय आल्यामुळे काळे यांनी सर्व पैसे परत मागीतले. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, माधव काळे यांनी अधिक चौकशी केली असता संदेश चव्हाण (रा. मुंढे, ता. कराड) यांची ४ लाख आणि राजेंद्र पिसाळ (रा. करवडी, ता. कराड) यांची १ लाख ९० हजारांची अशीच फसवणूक करण्यात आली असल्याचे त्यांना समजले. तसेच आणखी काही गुंतवणूकदार फसले असल्याचा संशय त्यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत व्यक्त केला आहे.
याबाबतची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक दीपक वागवे तपास करीत आहेत.