
कराड : कराड शहर व परिसरात मसाले दूध व्यवसायिक व दारू व्यवसायिकास जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या रेकॉर्डवरील गुंडाच्या कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. अवघ्या काही तासातच कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांनी रेकॉर्डवरील गुंड दीपक पाटील यास अटक करून त्याची कराड शहरातून चालवत दिंड काढण्यात आली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, कराड शहर व तालुका पोलीस ठाण्याचे हद्दीत गुंडाच्या टोळीने धुडगूस घालून दोन ठिकाणी तोडफोड करीत खंडणी वसूल केली. कराडनजीक वारुंजी फाटा येथे तसेच नारायणवाडी येथे या दोन घटना घडल्या. याप्रकरणी गुंडासह त्याच्या टोळीवर कराड शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कराड शहर पोलीस ठाण्यात अफताब अमजद मुतवली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वारूंजी फाटा परिसरात अफताब मुतवली यांचे केजीएन मसाले दूध सेंटर आहे. १ जून रोजी रात्री साडेनऊ वाजता दीपक पाटील व किरण यमकर यांच्यासह अनोळखी चार संशयित त्याठिकाणी आले. तुझे मसाले दुधाचे दुकान चांगले चालते. तू मला महिन्याला चार हजार रुपये द्यायचे. नाहीतर तुला धंदा करू देणार नाही, फिरू देणार नाही, असे त्यांनी अफताब मुतवली यांना धमकावले. तसेच त्यानंतर दुकानाच्या गल्यातील सात हजार रुपये जबरदस्तीने काढून घेत लोखंडी रॉडने दुकानातील काचेचे ग्लाससह इतर साहित्य फोडले. तसेच याच परिसरात अथर्व देशमुख यांच्या कारच्या काचा फोडून सुमारे ६५ हजारांचे नुकसान केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर तपास करत आहेत.
ग्रामीण पोलीस ठाण्यात अनिल रामचंद्र चंदवाणी यांनी दिपक पाटील, शिवतेज तांबे, पंकज पाटील, यशराज पाटील, किरण यमगर, गणेश पाटील यांच्यासह अन्य दोन अनोळखी संशयितांविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. १ जूनला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आणि रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दिपक पाटीलसह संशयितांनी चंदवाणी यांच्या वाईन शॉपमध्ये गोंधळ घातला. संशयीतांनी चंदवानी यांना ठार मारण्याची धमकी देत साडेसहा हजाराच्या दारूसह इतर साहित्य नेले. तसेच एका संशयिताने मोबाईल फोडत ५० हजारांची मागणी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना शिंदे तपास करत आहेत.