राज्यसातारासामाजिक

कराडमध्ये आत्मसाक्षात्कार व तणावमुक्त जीवनशैली कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

कराडकरांनी प्रा. नितीन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभवली सहजयोग ध्यानाची अनुभूती

कराड : येथील टिळक हायस्कूलच्या प्रांगणात नागरिकांसाठी रविवार (दि. १) जून रोजी एक विशेष आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या सहजयोग ध्यानपद्धतीवर आधारित “आत्मसाक्षात्कार व तणावमुक्त जीवनशैली” या विषयावर भरलेल्या या भक्तीसागरात कराडकर अंतर्मुख झाले. या कार्यक्रमाला कराडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमास श्रीनिवास जाधव, मानसिंगराव शिंदे, दयानंद यावलकर, अमोल बिराजदार, श्रीमती केंजळे, प्रकाश पाटील, दत्तात्रय इंगळे, प्रा. शिवाजीराव पाटील, शिवाजीराव देवकर, दादासाहेब शिंदे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात पूज्य श्री माताजींच्या प्रेरणादायी विचारांच्या व्हिडिओ प्रक्षेपणाने झाली. त्यानंतर प्रा. नितीन पवार यांनी सहजयोग ध्यानशास्त्र, त्यामधील आत्मसाक्षात्कार म्हणजे काय, आणि तो साध्य केल्यानंतर जीवनात कसे परिवर्तन घडते यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रा. नितीन पवार म्हणाले, “आपले खरे स्वरूप ओळखणे म्हणजेच आत्मसाक्षात्कार. तो केवळ वाचनाने किंवा विचारांनी प्राप्त होत नाही, तर प्रत्यक्ष अनुभवातूनच मिळतो. सहजयोग ही माताजींची दिलेली अशीच एक सोपी, परिणामकारक आणि सर्वांसाठी उपयुक्त ध्यानपद्धती आहे,” असे प्रा. पवार यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, कोणत्याही प्रकारचे मूल्य न आकारता जगातील तब्बल १६० देशांमध्ये माताजींनी सहजयोग पोहोचवला, हा भक्तीपरिवार वाढवला. त्यातून अनेकांना सहजयोग अनुभूती प्राप्त झाली आहे. अनेकांच्या शारीरिक व्याधी, गंभीर आजार व रोग यामुळे पूर्णतः बरे झाले आहेत. आपल्या शरीरात ७० हजार नाड्या आहेत. त्यातील मुख्य तीन नाड्या आणि सात चक्रांवर मानवाचे जीवन अवलंबून आहे. नकारात्मक विचार दूर करून शरीरातील आत्मशक्ती जागृत करण्यासाठी आपणही अनुभूती मिळवण्यासाठी नियमित योगधारणा करावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रस्ताविकात श्री. कोकरे यांनी सहज योगाची अनुभूती होण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे सांगितले. तसेच ऋषीमुनींनी सांगितलेली भाषा लोकांना समजण्यासाठी माताजींनी सहजयोग अनुभूती उपलब्ध करून दिली आहे. भक्तिमार्गाने अनेकांनी परमेश्वर मिळवला. मात्र, सर्वांची भक्ती फलश्रुत होतेच, असे नाही. नाथ संप्रदायाने घालून दिलेल्या परंपरेचा त्यांनी थोडक्यात आढावा घेत लोकांना सहजयोग अनुभूती समजावून सांगितली.

या कार्यक्रमात कराड व परिसरातील
शेकडो नागरिक, महिला, युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक व साधक सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी काढण्यात आलेल्या शोभा यात्रेसही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमात सहभागी झालेल्यांनी ध्यानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. अनेकांनी अंतर्मनातील शांतता, सकारात्मक ऊर्जा व ताजेपणा याचा अनुभव घेतल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर उपस्थितांना नियमित ध्यानसत्रांची माहिती देण्यात आली. कराडमधील सहजयोग साधक मंडळाकडून सर्व सहभागी नागरिकांचे आभार मानण्यात आले.

विनासायास, आपल्या जन्माबरोबर मिळणारी, शरीरातील परमेश्वररुपी आत्मा आणि चराचरातील पसरलेला परमात्मा एकत्र येणे म्हणजे योग. यातूनच मिळणारी अनुभूती म्हणजे सहजयोग असल्याचे प्रा. नितीन पवार यांनी सांगितले. तसेच परमेश्वराची शक्ती सर्वत्र पसरली असून तीच आपल्याला प्रत्ययास येते, असेही त्यांनी नमूद केले.

धर्म हा विकत घेता येत नाही, पण आज धर्म विकत घेणारे आहेत. अध्यात्मातही लोकांची फसवणूक होत आहे. सुशिक्षित लोक गुरूंच्या आहारी गेले आहेत. अशाच गुरूंचे हजारो, लाखो शिष्य आहेत. मात्र, अशा अनेक गुरूंनीच स्वतः आत्महत्या केल्याच्या बातम्या आपण वृत्तपत्रांमधून वाचल्या असतील. मग अशा भक्तीतून परमेश्वर मिळाला का? याचे सर्वांनी आत्मचिंतन करावे, असे आवाहनही प्रा. नितीन पवार यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी लतादीदी धुमाळ (नाशिक) आणि त्यांच्या साधक सहकाऱ्यांनी जोगवा आणि गोंधळ गीते सादर केली. त्यांना वादकांनीही उत्तम साद दिली. या भक्तिरसात कराडकर साधक, नागरिक तल्लीन झाल्याचे दिसून आले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close