राजकियराज्यसातारा

काँग्रेस कधीही संपू शकत नाही, आज भाजपला सुद्धा त्यांचा पक्ष वाढवायला काँग्रेसचीच मदत घ्यावी लागते : पृथ्वीराज चव्हाण

कराड : काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहचला आहे, त्यामुळे काँग्रेस कधीही संपू शकत नाही. स्वातंत्र्य मिळवण्यापासून देश प्रगतीपथावर आणण्यापर्यंत काँग्रेसने सत्ताकाळात काम केले आहे. आणि आता देश स्थिर झाल्यानंतर फेक नरेटिव्ह व खोटे आरोप करून भाजप आयते सत्तेवर आली आहे. आज भाजपला सुद्धा त्यांचा पक्ष वाढवायला काँग्रेस कार्यकर्त्यांची व नेत्यांची गरज भासत आहे म्हणूनच भाजप मोठा पक्ष दिसत आहे अशी टीका महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

कराड दक्षिण मधील पंचायत समिती सदस्य नामदेवराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजितराव पाटील, काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे पश्चिम महाराष्ट्र चे अध्यक्ष झाकीर पठाण, कराड उत्तर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निवासराव थोरात, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बंडानाना जगताप, अशोकराव पाटील, नानासो पाटील, नितीन थोरात, शिवाजीराव मोहिते, राजेंद्र चव्हाण, इंद्रजित चव्हाण, राहुल चव्हाण, मलकापूरच्या माजी नगराध्यक्षा नीलम येडगे, कराड दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्षा विद्याताई थोरवडे, गीतांजली थोरात, संजय तडाखे, उदय थोरात, वैभव थोरात, सुभाष पाटील, नानासो जाधव, पंकज पिसाळ आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रम दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, २०१४ साली भाजपने काँग्रेसवर खोटे भ्रष्टाचाराचे आरोप करून जनतेची दिशाभूल करून सत्तेवर आले पण नंतर न्यायालयात काँग्रेस सरकारमधील मंत्र्यांवर झालेले सर्व आरोप सिद्ध न झाल्याने निकाली काढण्यात आले व आरोपी माजी मंत्र्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले. पण तोपर्यंत काँग्रेसचे सरकार सत्तेवरून गेले होते, बिनबुडाचे भ्रष्टाचाराचे काँग्रेस सरकारवर आरोप केलेले भाजप त्यांचे सरकार आल्यानंतर त्यांच्या मंत्र्यांवर मोठमोठे भ्रष्टाचाराचे आरोप होऊन आणि ते आरोप पुरावयासहित असून सुद्धा एकही मंत्र्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही. जाती-धर्मात द्वेष पसरवून देशाची शांतता भंग केली जात आहे. धार्मिक द्वेष निर्माण करणारा देश कधीही प्रगती करू शकत नाही हा जागतिक इतिहास आहे. विकासाबाबतचे कोणतेही धोरण भाजपने कधीही राबविले नाही, विकासाचे जे आकडे सरकारकडून दाखविले गेले ते खोटे आकडे असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहेत. देशातील जनतेची दिशाभूल करून सत्ता हस्तगत करण्याचा पायंडा भाजपने घातला हि इतिहासात नोंद कायम राहील. तसेच भाजपकडे स्वतःचे कोणतेही कार्यकर्ते किंवा केडरबेस नसल्याने त्यांना देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसची गरज भासते. सत्तेचा गैरवापर करून ED, CBI, IT आदी विभागांचा म्हणेल तसा वापर करून घेऊन विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते गळाला लावले, ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करूनच भाजप जनतेकडून मते मागत आली आहे अशा नेत्यांना सोबत घेऊन त्या नेत्यांना क्लीनचिट देऊन पक्षात घेण्याचा कार्यक्रम आजपर्यंत सुरु आहे. हे कमी पडले म्हणून आता काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा सोबत घेण्याचा कार्यक्रम भाजपने आखला आहे, त्यामुळे काँग्रेसमुक्त देश करायला निघाली भाजप कधी काँग्रेसयुक्त झाली हे त्यांचे त्यांना सुद्धा कळले नाही. यामुळेच सत्तेच्या जीवावर मोठी झालेली भाजप संघटना फार काळ टिकू शकणार नाही. कारण जी ताकद काँग्रेस मध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे ते कधीही भाजपला जमणार नाही.

यावेळी अजितराव पाटील म्हणाले कि, कराड दक्षिण चाच काय पण महाराष्ट्रातीलच निकाल हा अनपेक्षित होता. झालेले आमदार जनतेने निवडून दिलेले नसून ते EVM आमदार आहेत. काँग्रेसने लोकशाहीची मूल्ये कायम जपली पण भाजपने ती पायदळी तुडवली आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करणाऱ्यांनी त्यांचे नेते फडणवीस आणि अमित शहा यांना जाऊन विचारावं कि, पृथ्वीराज चव्हाण कोण आहेत आणि मग टीका करावी. स्वतःच्या संस्थांच्या जीवावर आणि पैसा दाखविणाऱ्यानी हे आधी जाणून घ्यावे कि, तुम्ही उभा केलेल्या संस्था या काँग्रेसच्या आशीर्वादानेच उभारल्या गेल्या आहेत आणि त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा सुद्धा आशीर्वाद तुम्हाला मिळाला होता. पृथ्वीराज चव्हाण यांना जर संस्था उभ्या करायच्या असत्या तर त्यांनी किती उभा केल्या असत्या याची कल्पना सुद्धा तुम्ही करू शकत नाही. पण त्यांनी स्वतःचे घर भरून मोठे होण्यापेक्षा मिळालेल्या सत्तेचा उपयोग जनतेच्या विकासासाठी केला पाहिजे या तत्वानेच सत्तेचा उपयोग केला हे संस्कार आहेत प्रेमिलाकाकी चव्हाण व आनंदराव चव्हाण यांचे. तेव्हा त्यांच्या सोबत असणाऱ्यानी सत्तेचा उपयोग करून घेतला पण ते आता त्यांच्यासोबत नसून सत्तेसोबत आहेत यावरूनच सगळे समजते. आजच्या परिस्थितीत पृथ्वीराज चव्हाण काय आणि काँग्रेस काय यांना सोडून जाणारे हे जनतेच्या कामासाठी विकासासाठी सोडून जात नाहीत तर स्वतःचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी आणि स्वतःचा विकास साधण्यासाठीच जात आहेत, कारण ते सत्तेशिवाय राहूच शकत नाहीत, त्यांना विचार, देश, राष्ट्रभक्ती याचे काहीही पडलेले नाही.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close