
कराड ः कंटेनर ट्रकमध्ये आवश्यक ती जागा उपलब्ध नसताना नियमापेक्षा अधिक जनावरे भरून कत्तलीसाठी निघालेल्या कंटेनरला कोल्हापूर नाका येथे अडवून ताब्यात घेण्यात आले. यामध्ये सुमारे सव्वा लाख रूपये किमतीची 53 जनावरे होती. याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार संग्राम पाटील यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात दिली असून याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बिलाल आयुब खान (वय 30) व तालिम इसा खान (वय 25, दोघेही रा. रा. रिथट ता. नघीना, जि. नुह्यात, राज्य हरियाणा) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस हवालदार संग्राम पाटील हे शुक्रवारी सकाळी पेट्रोलिंग करीत असताना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांना कत्तलीसाठी जनावरांची वाहतुक होत असल्याची माहिती मिळाली. भापकर यांनी कर्मचाऱ्यांना कोल्हापूर नाका येथे महात्मा गांधी पुतळ्यासमोर पुणे-बेंगलोर हायवेवरून जाणारा कंटेनर अडविण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी कंटेकर अडवून पाहिले असताना त्यामध्ये वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना जनांवराना वेदना होतील अशा रीतीने बांधून तसेच चारापाण्याची देखभाल न करताना क्रूरपणे वागणूक देऊन कत्तलीसाठी सुमारे सव्वा लाख रूपये किमतीची 53 जनावरे घेऊन निघाल्याचे आढळून आले. याबाबत शहर पोलिसात दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार खिलारे करीत आहेत.