
कराड : कराड तहसील कार्यालयातील सेतू ठेकेदार याने विद्यार्थी व शेतकऱ्यांच्याकडून दाखल्यांसाठी ज्यादा रक्कम वसूल करून मालामाल झाला आहे. गेली अनेक वर्ष या सेतू केंद्र मधून ज्यादा रकमेची वसुली होत आहे याबाबत आजपर्यंत त्याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याने त्याला कुणाची भीती राहिली नाही याबाबत त्याच्या सेतू केद्राची चौकशी करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी तहसील कार्यालयातील येणाऱ्या विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.
कराड तहसील कार्यालयातील सेतू केंद्रामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार रक्कम घेणे आवश्यक होते. उत्पन्नाच्या दाखल्यासाठी व प्रतिज्ञापत्रासाठी 33 रुपये 60 पैसे घेऊन ऑनलाईन पद्धतीची पावती देणे बंधनकारक असताना कराड सेतू ठेकेदार याने उत्पन्नाच्या दाखल्यासाठी व प्रतिज्ञापत्रासाठी 50 रुपये घेतले असून त्याने तयार करून घेतलेल्या सॉफ्टवेअरची पावती दिली आहे.
तसेच सेतू ठेकेदार व सचिव जिल्हा सेतू समिती तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) यांच्यामध्ये झालेल्या करारनाम्यात सेतू ठेकेदार यांनी सेतू शुल्क म्हणून 16 रुपये 40 पैसे अथवा 20 रुपये घ्यावे याबाबत केलेल्या करारनाम्यात कोठेही उल्लेख केलेला दिसून येत नाही. मग सेतू ठेकेदार यांनी लोकांच्याकडून सेतू शूल्क म्हणून ज्यादा रक्कम का घेतली आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे.
तसेच सेतू ठेकेदार यांने शासनाची दिशाभूल करून सामान्य लोकांची फसवणूक करून सेतू ठेका ताब्यात घेतलेल्या दिनांक पासून दि. 20/12/2024 पर्यंत प्रतिज्ञापत्रासाठी व इतर दाखल्यासाठी जी ज्यादा रक्कम घेतली आहे ती त्याच्याकडून वसूल करून घेण्याबाबत काही समाजसेवक लवकरच तक्रार दाखल करणार आहेत. तसेच या रकमेची वसुली करून घेण्यासाठी मोठे आंदोलन उभारणार असल्याची चर्चा सध्या तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये सुरू आहे.
पुढील भागात – उपजिल्हाधिकारी व सेतू ठेकेदार यांच्यामध्ये झालेल्या बोगस करारनाम्या बाबत