
कराड : राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कृष्णा नदीवरील श्री क्षेत्र पाचवडेश्वर – कोडोली व रेठरे बुद्रुक येथे नवीन पुल उभारण्यासाठी निधी मिळाला आहे. दोन्हीही पुलांचे काम गतीने सुरू आहे. यामधील पाचवडेश्वर – कोडोली पुलाच्या कामाची आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी सायंकाळी पाहणी केली. या दरम्यान बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी काम प्रगतीपथावर असल्याची माहिती दिली. दरम्यान यावेळी आ. चव्हाण यांनी श्रावणी सोमवार असल्याने श्री क्षेत्र पाचवडेश्वर मंदिरात जावून दर्शन घेतले.
यावेळी बांधकाम विभागाचे उप विभागीय अभियंता प्रमोद चौधरी, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, युवा नेते इंद्रजित चव्हाण, कराड तालुका खरेदी – विक्री संघाचे व्हाईस चेअरमन जगन्नाथ मोरे, नारायणवाडीचे माजी सरपंच रणजित देशमुख, सर्जेराव यादव, जालिंदर यादव (गुरुजी), विकास सेवा सोसायटीचे चेअरमन कृष्णत यादव, ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ पाटील, महमद शेख, मजनू शेख, कालेटेकचे उपसरपंच अजित यादव, विकास पवार, विजय पाटील, शशिकांत यादव यांची उपस्थिती होती.
कृष्णाकाठ आणि कराड तालुक्यातील दक्षिण विभागातील डोंगरी भाग कनेक्टीव्ह करण्याच्या हेतूने आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पाचवडेश्वर ते कोडोली दरम्यान नदीवर महत्वाकांक्षी पुल उभारणीसाठी शासनाचा निधी आणला आहे. हे काम सद्या गतीने सुरू आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण झाल्यानंतर कृष्णाकाठ आणि डोंगरी विभागातील अंतर कमी होवून दळणवळण वाढणार आहे.
पुलाच्या निर्मितीमुळे कराड शहरातील वाहतुकीचा ताण कमी होवून सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा, पलूस, तासगाव, जत, कवठेमहांकाळ या भागातील पुणे, मुंबईकडे ये – जा करणाऱ्या वाहतुकीस हा पुल सोयीचा ठरणार आहे. हा पुल करण्याचे माजी आ. विलासराव पाटील – उंडाळकर यांचे स्वप्न होते. आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी गतवर्षी हा महत्त्वाकांक्षी पुल करण्यासाठी शासनाकडून तब्बल ४५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला. तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर पुलाचे काम सुरू झाले. सद्या हे काम गतीने सुरू असून, येत्या वर्षभरात काम पूर्ण करण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा मानस आहे.
हा पुल कऱ्हाड – रत्नागिरी राज्य मार्गावरील पाचवड फाट्यापासून सरळ आलेल्या रस्त्यावरून कृष्णा नदीवर सुरू आहे. पुलामुळे कोडोलीमार्गे डोंगरी भाग कृष्णाकाठाला जोडला जाणार आहे. कोडोली येथून कराड – तासगाव या राष्ट्रीय महामार्गाला जोड रस्ता होणार असून, सांगली जिल्ह्यातील पुणे व मुंबईकडे ये – जा करणाऱ्या वाहतुकीस हा पुल महत्वाचा ठरणार आहे. त्याचबरोबर पुलामुळे कराड शहरातील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. पुलाच्या या वाहतुकीतील साखळी मुळे कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतमाल व ऊस वाहतुकीसाठी पुणे – बेंगलोर हायवेची कनेक्टिव्हिटी मिळणार असून, हा महत्वाकांक्षी पुल या दोन्ही विभागासाठी वरदान ठरणार आहे, हे नक्की.
दृष्टीक्षेपात होणारा पुल…..
* अशाच पद्धतीने रेठरे बुद्रुक येथे आ. पृथ्वीराज चव्हाण माध्यमातून कृष्णा नदीवर पर्यायी व उंच पुल उभारणीचे काम सुरू आहे.
* पुलाचे पाचवडकडील बाजूने चार खांब उभा राहिले आहेत. उर्वरित काम सुरळीत होईल.
* पाचवडेश्वर – कोडोली येथे ३२० मीटर लांबीचा अद्ययावत पुल.
* पाचवडेश्वर व कोडोलीकडील दोन्ही बाजूला जोडरस्ते व संरक्षक भिंत.
* ४० मीटरच्या आठ गाळ्यांचा एकूण ३२० मीटर लांबीचा पुल बनणार आहे. ७. ५० मीटर रुंदीचा दुपदरी उंच पुल असणार.
* पाचवडकडील बाजूने ६५० मीटर व कोडोलीच्या बाजूने ८४० मीटर व १२ मीटर रुंदीचे जोडरस्ते तसेच भराव होणार आहे. त्याचबरोबर संरक्षक भिंत होणार.
यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पुलाच्या कामाची प्रगती जाणून घेतली. पुढील काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या. तांत्रिक अडचणी असतील, तर त्या सोडविण्यासाठी मी तत्पर असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.