
कराड ः कराड रेल्वे स्टेशनवर मध्य रेल्वेच्या पुणे-मिरज रेल्वेच्या इंजिन खालील व्हील ॲक्सल बॉक्सला अचानक अचानक आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. त्यामुळे प्रवाशांसह रेल्वे स्टेशनवर गोंधळ उडाला. घटनेचे गांभिर्य ओळखत कर्मचाऱ्यांनी आग विझवल्याने प्रवाशासह स्टेशनवरील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
याबाबत सविस्तर माहिती अशी, मध्य रेल्वेच्या पुणे-मिरज रेल्वे ही पुण्याहून मिरजला जाण्यासाठी सुटली. कराड रेल्वे स्टेशनवर ही एक्सप्रेस दुपारच्या सुमारास आली. स्टेशनवर आल्यानंतर अचानक इंजिन खाली असणाऱ्या ऑईल बॉक्सने अचानक पेट घेतला. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर एकच गोंधळ उडाला. प्रवाशासंह तेथे असणाऱ्या नागरिकांची एकच धावपळ उडाली. या रेल्वेच्या सात डब्यात सुमारे 300 प्रवासी प्रवास करीत होते. त्यांना रेल्वेच्या इंजिन खालील बॉक्स ऑईलला आग लागल्याचे समजताच प्रवासी घाबरून रेल्वेतून खाली उतरले. रेल्वे स्टेशनवर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी घटनेचे गांभिर्य ओळखून पुणे येथे ही घडलेली घटना कळविली. तोपर्यंत कराड रेल्वे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. त्यानंतर लगेच वंदे भारत एक्सप्रेसने त्यांचे पुणे येथील पथक कराड रेल्वे स्टेशनवर दाखल झाले. त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने सेफ्टी फायरने आग विझवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत कराड नगरपालिकेचे अग्निशमन गाडीही घटनास्थळी पोहचली होती. आग आटोक्यात येईपर्यंत सर्व प्रवाशांना दुसऱ्या रेल्वेने मिरजला पाठवण्यात आले. आग आटोक्यात आल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.