सुरेश धस मानायला तयार नसतील तर त्यांच्याही भूतकाळाची यादी आम्ही वाचणार : अमोल मिटकरी

मुंबई : दोन कोटींची खंडणी आणि देशमुख हत्या प्रकरणात नवनवे आरोप आणि गौप्यस्फोट करून मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ करणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांचीही कोंडी करण्याची रणनीती राष्ट्रवादीने आखली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी समजावून सांगूनही सुरेश धस मानायला तयार नसतील तर त्यांच्याही भूतकाळाची यादी आम्ही वाचणार असल्याचे सांगत सुरेश खाडे हत्या प्रकरण, कोठेवाडी दरोडा ते जमीन घोटाळा, अशी लांबच्या लांब यादीच राष्ट्रवादीचे आमदार प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी वाचली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धनंजय मुंडे यांच्यामागे खंबीरपणे उभा आहे. जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा घेणार नाही, असे सांगून अजित पवार यांनी राजीनामा मागणाऱ्या लोकांना एकप्रकारे संदेश दिला आहे. तसेच ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, मंत्री दत्ता भरणे, मंत्री हसन मुश्रीफ यांनीही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नसल्याचे अजित पवार यांच्या म्हणण्याला पुढे नेले आहे, याचाच अर्थ राष्ट्रवादी पक्ष पूर्णपणे ताकदीने धनंजय मुंडे यांच्या मागे उभा आहे, असे मिटकरी म्हणाले.
देशमुख यांची हत्या होण्याच्या दोन दिवसांआधी वाल्मिक कराड आणि सुरेश धस यांचा फोन झालेला आहे. तो फोन कोणत्या कारणांसाठी झाला, याची चौकशी सुरेश धस यांचा सीडीआर काढून झाली पाहिजे. जर दोघेही थेट संपर्कात असतील तर धस यांचीही वैयक्तिक चौकशी सरकारने केली पाहिजे, अशी मागणी मिटकरी यांनी केली.
पाथर्डी तालुक्यातील कोठेवाडी गावात जाने २००१ मध्ये कथित दारासिंग भोसले गँगने एका घरावर दरोडा घालून चार महिलांवर अत्याचार आणि दोन खून झाले होते. त्यावेळी लाखो रुपये लुटण्यात आले होते. त्यावेळी भुजबळ गृहमंत्री होते. या गँगचा प्रमुख दारासिंग उर्फ मारूती भोसले याच्याशी कुणाच्या भावाचे अर्थपूर्ण संबंध होते? असा सवाल करून मिटकरी यांचा रोख धस यांच्याकडे होता. तसेच कोठेवाडीला दरोडा पडला त्यावेळी १७ दरोडेखोरांच्या अंगावर सुरेश धस मित्रमंडळ असे लिहिलेले टी शर्ट होते यासंदर्भातील पुरावेही मी देणार असल्याचे मिटकरी म्हणाले.
८ हिंदू आणि २ मुस्लीम देवस्थानांची १४२१ कोटींची संपत्ती कुणी हडपली? असा सवाल करून जमिनी हडपताना किती निष्पापांचे मृतदेह गाडले हे सर्वांना माहिती आहे.राम खाडे खून, सतीश शिंदे यांची हत्या, अॅट्रोसिटी, हाफ मर्डर… अशी यादी फार मोठी आहे, योग्यवेळी समोर आणेन, अशी यादी वाचून जर शांत बसला नाहीत तर आम्हीही आरोपांची राळ उठवू आणि चौकशीची मागणी करू असा इशारा मिटकरी यांनी धस यांना दिला.
आष्टी पाटोदा तालुक्यातील वाळू प्रकरण, बोगस मनरेगाची प्रकरणे, हफ्तेवसुली, आष्टीमधील ८५ बार आणि धाब्यावर बनावट दारू विक्री, विक्रम धस हत्या प्रकरण, मनी लॉन्ड्रिंग्ज अशी मोठी यादी आहे. आपण फार मृदू आहोत, सोज्वळ आहोत असे भासविण्याचा प्रयत्न करू नये, आपलाही इतिहास चांगल्या प्रकारे लोकांना माहिती आहे, असे उत्तर मिटकरी यांनी धस यांना दिले.