
कराड ः घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून पोलिसांनी चोरट्याला गजाआड केले. त्याच्याकडून 80 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
सचिन आनंदा माने (वय 32, रा. तुळसण, ता. कराड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादी महिला मुंबईला गेलेली असताना चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत साहित्य लंपास केले होते. याबाबतचा गुन्हा दाखल झाल्यानंतर उपअधीक्षक अमोल ठाकूर आणि पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी गुन्हे शाखेला तपासाबाबत सूचना केल्या. त्यानुसार पोलीस अंमलदार नितीन येळवे, उत्तम कोळी, सज्जन जगताप, सचिन निकम, मोहित गुरव, प्रफुल्ल गाडे हे तपास करीत असताना सोमवारी सायंकाळी पाचवड फाटा येथे एकजण पोत्यात साहित्य भरून संशयास्पदरित्या निघाल्याचे दिसून आले.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील पोत्याची झडती घेतली असता त्यामध्ये एलईडी टीव्ही आढळून आला. त्याच्याकडे कसून तपास केल्यानंतर चोरीची सायकल, गॅस सिलेंडर, शेगडी, शिलाई मशीन आणि दोन एलईडी टीव्ही तसेच 1 हजार 470 रुपयांची रोकड असा 82 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याबाबतची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. हवालदार उत्तम कोळी तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, डीवायएसपी अमोल ठाकूर व पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमंलदार नितीन येळवे, उत्तम कोळी, सज्जन जगताप, सचिन निकम, मोहित गुरव, प्रफुल्ल गाडे यांनी केली.