क्राइमराज्यसातारा

विनापरवाना पिस्टल व काडतुस विक्रीप्रकरणी सराईत गुन्हेगारासह दोघांना अटक

कराड : गोळेश्वर (ता. कराड) गावच्या हद्दीतील पवार वस्ती रस्त्यावर विनापरवाना बेकायदेशीर पिस्टल व काडतुस विक्री व खरेदीसाठी आलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. बुधवार (दि. २९) रोजी कराड शहर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली. यामध्ये संशयितांकडून पोलिसांनी दोन पिस्टल व तीन जिवंत काडतुसे असा एकूण १ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

आकाश हिंदुराव चव्हाण (वय 27) रा. कार्वेनाका ता. कराड, तेजस भाउ गुरव (वय 24) रा. हजारमाची ता. कराड व जय लवराज कणसे (वय 20) रा. नवीपेठ मायणी, ता. खटाव अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार विजय राजाराम मुळे (वय 43) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

यातील तेजस गुरव हा सराईत गुन्हेगार असून याच्यावर यापूर्वी आर्थिक फायदयासाठी संघटीत गुन्हेगारी, शरीराविरुद्धचे अपराध, दहशत पसरवणे व अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आक्या चव्हाण रा. कार्वेनाका (कराड) हा बुधवार, (दि. २८) रोजी कार्वेनाका ते गोळेश्वर रस्त्यावर त्याच्याकडील बेकायदेशीर विनापरवाना पिस्टल व काडतुसे एका पार्टीस विक्री करण्यासाठी थांबला असल्याची माहिती पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडून मिळाली. त्यानंतर कराड शहर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर व त्यांच्या पथकाने गोळश्वर रस्त्यावरील पवारवस्ती येथे पोहचत सापळा रचला.

यावेळी उसाच्या शेतालगतच्या विहिरीजवळ थांबलेल्या आक्या चव्हाणकडे अन्य दोन जण चालत आले. त्यांच्यात चर्चा सुरु असताना केशरी रंगाच्या पिशवीत असलेल्या वस्तूंची त्यांनी देवाण-घेवाण चालू केली. यावेळी सपोनि अशोक भापकर यांच्यासह त्यांच्या पथकाने तिघांनाही ताब्यात घेत त्यांची अंगझडती घेतली. यामध्ये तेजस गुरव याच्याकडे सिल्वर रंगाचे पिस्टल, जय कणसे याच्याकडे तीन जीवंत काडतुसे, तर आकाश चव्हाण याच्याकडे एक पिस्टल मिळून आले. चौकशीत त्यांच्याकडे कोणताही शस्त्र परवाना नसून ते पिस्टल व काडतुसांची विक्री व खरेदी करण्यासाठी एकत्र आल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडील ८० हजार व ६५ हजार रुपये किमतीच्या दोन बनावटी पिस्टल्स व १५ हजार रुपये किमतीची तीन जीवंत काडतुसे असा एकूण १ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी तिघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात बेकायदेशीर विनापरवाना पिस्टल व काडतुस बाळगणे आणि त्याच्या विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदराची कारवाई वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांच्यासह पो.ना. स्वामी, पो.को. जाधव, पो.को. सांडगे, पो.को. देशमुख, पो.की. मोमीन, पो.का. पाटील, म.पो.शि. पिसाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि फारणे, पो.हवा. फडतरे, पो.हवा. पाटील, पो.हवा. कुंभार, पो.ना. यादव, पो.कॉ. जाधव यांनी केली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close