लोकसभेच्या सर्व 42 जागा स्वबळाकर लढणार
तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले जाहीर

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील लोकसभेच्या सर्व 42 जागा स्वबळाकर लढणार असल्याचे आज जाहीर केले. त्याच वेळी तृणमूल काँग्रेसने हा राज्यापुरता निर्णय घेतला असून राष्ट्रीय पातळीवर आम्ही इंडिया आघाडीतच राहणार असल्याचेही ममतांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आम आदमी पक्षानेही पंजाबमध्ये तशीच भूमिका घेत राज्यातील सर्व जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसकडे मी जागावाटपाचा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावाला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे राज्यात स्वबळावर लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याचे ममता बॅनर्जी यांनी नमूद केले. ममतांच्या स्वबळाच्या घोषणेनंतर काँग्रेसने लगेचच प्रतिक्रिया दिली असून ममतांशिवाय इंडिया आघाडीचा विचारही केला जाऊ शकत नाही. त्या आघाडीतील भक्कम आधारस्तंभांपैकी एक आहेत, असे काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले. इंडिया आघाडी पश्चिम बंगालमध्ये एकजुटीने लढेल आणि विजयी होईल असा विश्वासही रमेश यांनी व्यक्त केला.