
कराड : कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोबाईल चोरीप्रकरणी सऱ्हाईत गुन्हेगारास चार तासात अटक केली. त्याच्याकडून दोन मोबाईल व एक दुचाकी असा एकूण 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शनिवार (दि. 1) रोजी ही कारवाई करण्यात आली.
विजय अभिमान सानप (वय 26) रा. जुळेवाडी (ता. कराड) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शनिवार दि. 1 रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास संजयनगर, शेरे (ता. कराड) गावच्या हददीत कराड – तासगाव रस्त्याकडे फिर्यादी त्याचा मोबाईल हातात घेऊन उभा असताना दुचाकीवरून (एम. एच. 50 जी 8044) आलेल्या एका अनोळखी इसमाने फिर्यादीच्या कानफाडीत मारून ‘मोबाईल दे नाही तर तुला खल्लास करुन टाकीन’ अशी धमकी देवून फिर्यादीचा मोबाईल घेवून निघून गेला. याबाबत फिर्यादीच्या तक्रारीनुसार कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठांच्या सूचनेनुसार पेट्रोलिंगवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक साक्षात्कार पाटील व डी.बी पथकाने शेरे (ता. कराड) गावच्या हद्दीत शेणोली स्टेशन ते रेठरे कारखाना रस्त्यावर सदर गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीवरून जाणाऱ्या विजय अभिमान सानप (वय 26) रा. जुळेवाडी (ता. कराड) या संशयितास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर कोणाचे कबुली दिली. या कारवाईत त्याच्याकडून पोलिसांनी 35 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल व 35 हजार किंमतीची एक दुचाकी असा एकूण 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सपोनि अभिजीत चौधरी तपास करीत आहेत.