
अमरावती : सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांचे तब्बल तीन लाख 50 हजार रुपये लुबाडले. त्या प्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर.टी. घोगले यांच्या न्यायालयाने आरोपी तीन वर्षे कारावासाठी शिक्षा ठोठवली.
मंगेश रामदास भांबुरकर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. न्याय दंडाधिकारी गोगले यांच्या न्यायालयाने शुक्रवारी सदर प्रकरणाचा निकाल दिला. संदीप भाऊराव मुंडे रा. हातुर्णा भातुकली यांना आदिवासी विकास विभागात नोकरी लावून देतो असे खोटे आमिष दाखविले होते. नोकरी करता सात लाख रुपये लागतील अशी मागणी मंगेश भांबुरकर यांनी केली होती. मंगेश भांबुरकर हा तक्रारकर्ते संदीप मुंडे यांचे चुलत जावई असून ते शासकीय नोकरीत असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या एका साथीदारास साडेतीन लाख रुपये 19 जून 2013 रोजी वडिलांसमोर दिले होते. परंतु पैसे देऊन ही बऱ्याच दिवसापर्यंत संदीप मुंडे यांना शासकीय नोकरी लागली नाही त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुंडे यांनी गाडगे नगर पोलिसात तक्रार नोंदवली असता पोलिसांनी मंगेश रामदास भांबुरकर विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. तपासी अंमलदार रवींद्र नाईकवाड यांनी न्यायालयामध्ये दोषारोप पत्र सादर केले होते. सरकारच्या वतीने न्यायालयाने एकूण पाच जणांची साक्ष तपासली. न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपी मंगेश भांबुरकर विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा सिद्ध झाला. सरकारच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता सागर महल्ले व उज्वला श्रीराव यांनी युक्तिवाद केला. न्यायदंडाधिकारी आर.टी. घोगले यांनी आरोपीस तीन वर्ष कारावास पाच हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक महिन्याचा अतिरिक्त कारावास आरोपीस भोगावे लागेल. पैरवी म्हणून अमोल शिरसागर यांनी सहकार्य केले.