अजित पवारांचे ४२ आमदार निवडून आले? त्यांचे चार पाच आमदार तरी येतील का? असं सगळ्यांना वाटत होतं, कुणाचा तरी विश्वास बसेल का? : राज ठाकरे

मुंबई : राज ठाकरे यांनी आज वरळीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाबाबत भाष्य केलं. एवढंच नाही तर अजित पवारांना ४२ जागा कशा काय मिळाल्या?
त्यांना पाच ते सहा जागा मिळणंही कठीण होतं, लोकांनी मतं दिली आहेत ती आपल्यापर्यंत पोहचली नाहीत असं राज ठाकरे म्हणाले. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) च्या नेत्याने राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
भाजपाला १३२ जागा मिळाल्या चला ठीक आहे. २०१४ ला त्यांना १२२ जागा मिळाल्या होत्या, नंतर १०५ आल्या, आता १३२ आल्या समजू शकतो. अजित पवारांचे ४२ आमदार निवडून आले? त्यांचे चार पाच आमदार तरी येतील का? असं सगळ्यांना वाटत होतं. कुणाचा तरी विश्वास बसेल का? जे इतके दिवस राज्यात राजकारण करत आले आहेत, ज्यांच्या जिवावर भुजबळ, अजित पवार मोठे झाले त्या शरद पवारांना १० जागा? न समजण्याच्या पलिकडची गोष्ट आहे. चार वेळा लोकसभा निवडणूक झाली. त्यावेळी सर्वाधिक खासदार काँग्रेसचे निवडून आले. त्यांचे यावेळी फक्त १५ आमदार निवडून आले. लोकसभेला एक खासदार निवडून आलेल्या अजित पवारांचे ४२ आमदार आले? काय झालं, कसं झालं हा संशोधनाचा विषय आहे.
मी तुम्हाला सांगायला आलो आहे की मतदानावर जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे, ते आपल्यापर्यंत आलं नाही. लोकांनी मतदान केलं, पण ते गायब झालं. अशा प्रकारे निवडणूक लढवायची असेल तर कशाला निवडणूक लढवायची? ही गोष्टही निघून जाईल, कुणीही अमरपट्टा घेऊन जन्माला येत नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंना उशिरा उठून चिंतन करण्याची सवय असल्याने आज विधानसभा निकालाच्या दीड महिन्यानंतर त्यांचं वक्तव्य समोर आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४२ जागा कशा आल्या? याचा शॉक त्यांना दीड महिन्यानी बसला आहे. अजित पवार दिवसरात्र काबाडकष्ट करतात, मेहनत करतात त्यामुळे विधानसभेत त्यांना ४२ जागांपर्यंत मजल मारता आली. राज ठाकरेंनी सुपुत्राचा दारुण पराभव का झाला? आणि आपल्या जागा का निवडून आल्या नाहीत? यावर त्यांनी भाष्य करावं. त्यासाठी त्यांनी अजित पवारांसारखं पहाटे पाच वाजल्यापासून कामाला लागलं पाहिजे असा खोचक सल्ला अमोल मिटकरींनी राज ठाकरेंना दिला आहे.