
कराड ः मनोजदादांनी सुरुवातीपासून शेतकऱ्यांसाठी काम केले आहे. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ऊसला हमीभाव मिळण्यासाठी त्यांची अनेक आंदोलने आजही लोकांच्या लक्षात आहेत. शेतकऱ्यांच्या ऊसाला शाश्वत दर मिळावा म्हणून त्यांनी स्वतः साखर कारखाना काढून आज जिल्ह्यामध्ये चांगला दर देण्याची परंपरा कायम ठेवलेली आहे. मनोजदादा हे शेतकऱ्यांचे खरे नेते असून शेतकऱ्यांचा कळवळा आहे, असे प्रतिपादन बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष उदय पाटील यांनी केले.
मसूर येथील आश्वमेघ मंगल कार्यालय येथे कराड उत्तर मधील बैलगाडा चालक-मालक संघटनेचा मेळावा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र बैलगाडी संघटनेचे सचिव विलास देशमुख, मनोजदादा घोरपडे, उपाध्यक्ष राजेंद्र जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
उदय पाटील पुढे म्हणाले, मसूर कोपर्डे विभागासाठी शेतीच्या पाण्याची कमतरता होती. त्यासाठी तारळी धरणातील पाणी कोपर्डी लिंक कॅनॉल द्वारे आणून या विभागातील शेतकऱ्यांच्या पिकास जीवदान दिले. चाळीस वर्षे रखडलेली हणबरवाडी-धनगरवाडी पाणी योजना कार्यान्वित करून पूर्ण केली. शेतकऱ्यांना औषध फवारणीसाठी 50% सवलतीत पंपाची वाटप केले. अशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी अनेक उपक्रम राबवत त्यांनी आपले नेतृत्वाची झलक दाखवून दिलेली आहे. कराड उत्तर मध्ये कराड केसरी नावाने मोठ्या प्रमाणात बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात येते. यासारखे पारदर्शक मैदान महाराष्ट्रात कुठेही भरत नाही यावर्षी पावसामुळे बैलगाडा शर्यतीत अडथळा आला तरी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटणारा निर्णय घेऊन सर्व गाडी मालकांना प्रत्येकी 16 हजार रुपये बक्षीस दिले. येणाऱ्या विधानसभेला त्यांना आमदार करण्यासाठी आपल्या संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे.
यावेळी बोलताना मनोजदादा म्हणाले, शेतकऱ्यासाठी बैल हा अत्यंत प्रिय प्राणी असून त्याच्या संवर्धनासाठी व शेतकऱ्यांसाठी अविरत काम करण्याची भूमिका पहिल्यापासूनच आहे. आजही आमच्या घरी बैल आहेत.
यावेळी कोरेगाव तालुका उपाध्यक्ष प्रकाश पैलवान, पै. तुषार माने, ओंकार जगदाळे, दादा घोलप, अमोल पवार, किरण भिसे, महेश चव्हाण, अनिल माने आदी मान्यवर उपस्थित होते.
कराड उत्तर मधील सर्व बैलगाडा चालकांना मोफत विमा संरक्षण देणार आहे. सर्व चालकांचा विमा काढला जाईल.
– मनोजदादा घोरपडे