
कराड ः कोपर्डे हवेली ता. कराड येथील बेघर वसाहतीत गुरूवारी भरदिवसा कडीकोयंडा उचकटून पाच तोळे सोने चोरीची घटना घडली होती. पोलिसांनी गतीने तपास करत या प्रकरणी दोघा संशयितांना राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे.
रोहन लक्ष्मण वाघमारे (वय 22) व अतुल जगन्नाथ रोडगे (वय 21 दोघे रा. कोपर्डे हवेली) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पारुबाई हणमंत पाडूळे यांच्या घराचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी घरातील साहित्य विस्कटून पाच तोळे सोने चोरून नेले होते. यामध्ये चेन, झुबे, बोरमाळ, बेलाचे पान, अंगठी असा ऐवज होता. चोरीप्रकरणी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यास याबाबतची माहिती देण्यात आली होती. पोलिसांना माहिती मिळताच सातारचे श्वान पथकही मागविण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी तपासाची गती वाढवत शनिवारी चोरीप्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. बेघर वसाहतीत अन्य ठिकाणी झालेल्या चोऱ्यांचीही त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.