
कराड ः नरेंद्र मोदींनी दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या मिळतील अशा घोषणा केल्या पण गेल्या 10 वर्षात कोणतीच नोकरभरती झाली नाही आणि तरुणांना जुगाराच्या वाईट सवयी लावण्यासाठीच बेधडक जुगाराच्या जाहिराती सुरु आहेत. काँग्रेस असताना कधीही जुगार, दारू आदींच्या जाहिराती होत नव्हत्या पण आता जुगाराच्या जाहिराती माध्यमावर चालू आहेत कारण जुगार कंपन्यांकडून भाजपा ला इलेक्ट्रॉल बॉण्ड च्या माध्यमातून 1400 कोटींची देणगी दिली गेली. असा चंदा दो धंदा लो असा उद्योग नरेंद्र मोदींनी केला आणि यामुळेच मोदींनी जुगार उद्योगाना प्रोत्साहन देण्याचे काम केले असल्याचा घणाघात उंब्रज येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात, सभापती एम. जी. थोरात, मारुती जाधव, मोहनराव माने, वसंतराव जगदाळे, नंदकुमार जगदाळे, संपतरावं इंगवले, वसंत पाटील, इंद्रजित जाधव, सुरेश पाटील, मधुकर जाधव, अनिल मोहिते, उमेश मोहिते, संग्राम पवार, अमित जाधव, प्रवीण वेताळ, दत्ता काशीद, भीमराव डांगे, उमेश साळुंखे, संजय घाडगे, यांच्यासह कराड उत्तर मधील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, काँग्रेस जाहीरनाम्याबाबत कायमच प्रयत्नशील राहिली आहे व त्यानुसार कायम अंमलबजावणी सुद्धा केली आहे. काँग्रेसने 70 वर्षात काय विकास केला हे काँग्रेसने सांगण्याची गरज नाही तर देशातील जनताच उदाहरणाने तुम्हाला सांगत आहे. पण मोदींना त्यांनी 10 वर्षात काय विकास केला हे सांगता येत नसल्यानेच धार्मिक तेढ निर्माण करण्याची भाषा, काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत दिशाभूल वक्तव्य मोदी करत आहेत.
अनेक उद्योगपतींचे उद्योग काढून फक्त अदानीला दिले जात आहेत आणि म्हणून बाहेरील देशातील उद्योग भारतात येत नाहीत. कारण आपला देश हुकूमशाही कडे निघाला आहे. 15 लाख खात्यावर येतील हा जुमला होता हे अमित शहानी मान्य केल, पण 100 दिवसात परदेशातील काळा पैसा परत येईल अशी घोषणा केली होती का नव्हती? पण काळा पैसा तर आणला नाहीच पण काळा पैसा वाल्याना तुम्ही पाठीशी घातले. अशा किती घोषणा सांगता येतील कि मोदींनी त्या पूर्ण केल्या नाहीत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो म्हणाले पण त्यांच्या उत्पन्नावर टॅक्स लावला ही वस्तुस्थिती आहे. महागाई कमी करणार म्हणून घोषणा केल्या पण महागाई दुप्पट करून टाकली. रुपयाचे मूल्यांकन वाढविणार म्हणाले पण ते आणखी कमी केले. पेट्रोल डिझेल दरावरून दिशाभूल केली आज कच्चे तेलाचे दर कमी असून सुद्धा पेट्रोल डिझेलचे दर 100 च्या पारच आहेत.
यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कराड उत्तर विभागाचा काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला इतका मोठा प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते. कराड उत्तर मधील काँग्रेस अजून जिवंत आहे व ती पुन्हा कार्यान्वित करण्याचे काम अध्यक्ष निवास थोरात यांनी केले असल्याचे समाधान यानिमित्ताने वाटते.