ताज्या बातम्याराजकियराज्य

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यातील सर्व 288 विधानसभा जागांवर निवडणूक लढण्याची तयारी सुरू : अंबादास दानवे

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने राज्यातील सर्व 288 विधानसभा जागांवर निवडणूक लढण्याची तयारी सुरू केल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले आहेत. अंबादास दानवे यांच्या या वक्तव्यामुळे महाविकासआघाडीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.

सगळ्या मागण्या सुरू आहेत, मेरिटवर जागा लढवाव्यात अशी चर्चा सुरू आहे, पण तसं झालं नाही तर शिवसेनेने 288 जागांची तयारी केली आहे, पण आम्ही महाविकासआघाडी म्हणून लढतोय, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत.

ज्या जागा मागितल्या आहेत त्या वाट्याला येतील, असा विश्वासही अंबादास दानवे यांनी व्यक्त केला आहे. अंबादास दानवे धाराशिवमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

‘आकड्याचा विषयच निर्माण होत नाही. मेरिट महत्त्वाचं आहे, आकडे जास्त असतील, कमी असतील. महाविकासआघाडीमध्ये हा मुद्दा महत्त्वाचा राहणार नाही. ज्यांचं काम ज्या ठिकाणी चांगलं आहे, कार्यकर्ते चांगले आहेत, नेतृत्व चांगलं आहे, तो ती जागा लढेल, असं सूत्र राहिल. आम्ही 288 जागांसाठी तयार आहे, पण महाविकासआघाडी होत असताना प्रत्येकाच्या जागेची वाटणी होत असते, त्याप्रमाणे वाटणी होईल,’ असं अंबादास दानवे यांनी सांगितलं आहे.

याआधी मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून महाविकासआघाडीमध्ये वाद पाहायला मिळाला. महाविकासआघाडीच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडणुकीआधीच जाहीर करावा, अशी भूमिका शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांसमोर मांडली. तसंच ज्यांच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युलाही उद्धव ठाकरेंनी अमान्य केला. जास्त जागा असेल त्यांचा मुख्यमंत्री, यामध्ये मित्रपक्षाचे उमेदवारच पाडले जातात, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आधीच जाहीर करण्याची मागणी शरद पवार आणि काँग्रेसने फेटाळून लावली. मुख्यमंत्रिपदाबाबत निवडणुकांच्या निकालानंतर आमदारांची संख्या बघून ठरवू, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. यानंतर काँग्रेसनेही शरद पवारांच्या सूरात सूर मिळवला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close