आमच्या बहिण्याच्या इज्जतच्या काचा फुटल्या त्याची जबाबदारी कोण घेणार…? : वसंत मोरे

पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला गेला. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला तीन दिवसांनंतर अटक करण्यात आली.
मात्र तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतर ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी शिवसैनिकांसोबत बुधवारी स्वारगेट बस स्थानकात घुसून सुरक्षा रक्षकांची केबिनची तोडफोड केली होती. ज्यानंतर उद्धव ठाकरेंनी फोनवर संवाद साधत वसंत मोरेंचे कौतुक केले होते.
मात्र याच घटनेवरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वसंत मोरेंवर निशाणा साधला आहे. अजित पवार म्हणाले, “स्वारगेट एसटी आगारात घडलेली घटना ही निश्चितच दुर्दैवी आहे. अशा घटनांना आळा घालण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सरकार करत आहे.
स्वारगेट अत्याचार प्रकरणाचा पूर्ण तपास होऊन सत्यता पुढे येऊ द्या. एखादा आरोपी सापडत नाही म्हणून तोडफोड करत असाल तर, स्वतःला वेगळं दाखवण्याचा प्रयत्न कराल. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कोणी करत असेल तर तो पक्ष किंवा त्या कार्यकर्त्याकडून वसूल केला पाहिजे, असं कोर्टाने सांगितलं आहे.
स्वतःला वेगळं दाखवण्याच्या प्रयत्नात कोणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. काही प्रकरणात राग व्यक्त करण्याच्या काही गोष्टी असू शकतात.
काही अतिउत्साही कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळतोय, त्यांच्यावरही कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई केली जाईल,” असे अजित पवार यांनी नाव न घेता वसंत मोरे यांच्यावर टीका केली.
दरम्यान, आता अजित पवारांच्या या टीकेला वसंत मोरेंनी जोरदार शब्दात प्रत्युत्तर दिल आहे. माध्यमांशी बोलताना वसंत मोरे म्हणाले की, ‘आदरणीय दादा चार काचा फुटल्या त्याची काळजी आहे मग त्या आमच्या बहिण्याच्या इज्जतच्या काचा फुटल्या त्याची जबाबदारी कोण घेणार…? असा थेट सवालच त्यांनी अजित पवारांना केला आहे.
ते पुढे म्हणाले, “जे कार्यकर्ते अशा विषयांमध्ये प्रतिक्रिया देतात त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार असेल तर बिनधास्त करा, अस्वलाच्या अंगावर जर एखादा केस वाढला तर त्याला फरक पडत नाही. त्यामुळे एखाद्या माझ्या बहिणीसाठी जर मी अशा प्रकारचं पाऊल उचल असलं तर त्याला संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे.
अजितदादा या राज्याचे खूप मोठे नेते आहेत. माझ्या वर गुन्हे दाखल होणार असेल तर बिनधास्त होउदे, त्याच बरोबर या शहरात दिवसेंदिवस कोयता गॅंग फिरत आहे, मर्डर होत आहे.. याकडे देखील त्यांनी लक्ष दिलं पाहिजे’. असं देखील यावेळी वसंत मोरे म्हणाले.