एसटी महामंडळाच्या चालक-वाहकांनी कर्तव्यावर असताना मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार निश्चित केलेला गणवेश परिधान करावा

पुणे : पुण्यातील स्वारगेट बस आगारात उभ्या असलेल्या एसटीत एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला पोलिसांनी अटक केली आहे
मात्र, बस स्थानकात अशा प्रकारची घटना घडल्याने एसटी महामंडळ निशाण्यावर आले आहे. या सगळ्या प्रकरणानंतर राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
स्वारगेट शिवशाही प्रकरणानंतर राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने जनमानसात प्रतिमा मलीन होणे आणि प्रवासी सुरक्षेचे कारण देत गणवेश सक्तीचे आदेश एसटी मुख्यालयाने काढले आहेत. दरम्यान, आदेशाबाबत एसटी कामगार संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. एसटी महामंडळाच्या चालक-वाहकांनी कर्तव्यावर असताना मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार निश्चित केलेला गणवेश परिधान करूनच कामगिरी करणे आवश्यक आहे, असे आदेश एसटी मुख्यालय असलेल्या महाराष्ट्र वाहतूक भवनमधून देण्यात आले आहेत.
सद्यस्थितीत खाकी गणवेशाशिवाय अन्य गणवेशात चालक-वाहक कर्तव्यावर असल्याचे दिसून येत आहे. यामुळे महामंडळाची जनमानासात प्रतिमा खराब होते. त्याचबरोबर प्रवाशांच्या मनात सुरक्षेबाबतही शंका उपस्थित होण्याची भीती निर्माण होण्याची शक्यता आहे. चालक-वाहक व सर्व गणवेशधारी कर्मचाऱ्यांना नेमून दिलेल्या गणवेशातच कर्तव्य बजावण्याचे आदेश वाहतूक विभागाने दिले आहेत.
सर्व कर्मचाऱ्यांनी गणवेश धारण करूनच कर्तव्य बजावायचे आहे. मार्ग तपासणी पथकामार्फत, सुरक्षा व दक्षता शाखेतील तपासणीसांकडून व आगारभेटीवेळी सर्व संबंधितांकडून गणवेश नियमांचे पालन होत असल्याचे तपासणी करणे गरजेचे आहे. नियम भंग करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, असे या आदेशात म्हटले आहे. एखादी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्यानंतर एसटी प्रशासनाला जाग येते आणि चालक वाहक व इतर गणवेशधारी कर्मचाऱ्यास जाचक होणारे आदेश काढण्यात येतात. ‘गणवेशाचे कापड दिले, मात्र शिलाई मिळाली नाही,” अशी प्रतिक्रिया एसटी कामगार संघटनेने दिली आहे.
स्वारगेट प्रकरणानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, कोणत्याही परिस्थितीत चालक-वाहकांना खाकी रंगाचे लोगो एम्ब्रॉयडरी केलेले टी-शर्ट गणवेश म्हणून परिधान करण्यास पूर्ण बंदी घालावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.