
कराड : यशवंतनगर ता. कराड येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एक अर्ज दाखल झाला आहे.
माजी आ.चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली मसूर गटातून विद्यमान संचालक संतोष शिदोजीराव घार्गे वडगाव जयराम स्वामी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.पहिल्या दिवशी एकूण 11 उमेदवारी अर्जाची विक्री झाली आहे.
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांनी ही माहिती दिली.
27 ते 5 मार्च दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी 6 मार्च रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. वैध उमेदवारांची नावे 7 मार्च रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात प्रसिध्द करण्यात येणार आहेत. 7 ते 21 मार्च या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. पात्र उमेदवारांना 24 मार्च रोजी सकाळी 11 वाजता निशाणी वाटप करण्यात येणार आहे. उमेदवारांची अधिकृत यादी याच दिवशी प्रसिध्द करण्यात येणार आहे. 5 एप्रिल रोजी मतदान होणार असून 6 एप्रिल रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. या कारखान्यासाठी सभासदांची संख्या 32 हजार 205 आहे.21 संचालकांच्या जागेसाठी ही निवडणूक होत आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक राहुल देशमुख व उपनिबंधक अपर्णा यादव काम पहात आहेत.