ताज्या बातम्याराजकियराज्य

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून देवेंद्र फडणवीस यांचं पुन्हा कौतुक, एकनाथ शिंदेंवर टीका

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत काहीसं मवाळ धोरण उद्धव ठाकरेंनी घेतल्याचं दिसून येतं आहे.

सामनातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमनं उधळण्यात आली आहेत. एक काळ असाही होता की उद्धव ठाकरे हे सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना दिसले. मात्र आता त्यांनी त्यांचा रोख एकनाथ शिंदेंकडे वळवला आहे.

“देवेंद्र फडणवीस यांनी राज्यकारभारात शिस्त आणण्यासाठी कडक पावलं उचलली आहेत. मागच्या तीन वर्षांत भ्रष्टाचाराचा धबधबा वाहात होता. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या राज्याचं राजकारण कुजलं. आर्थिक बेशिस्तीने टोक गाठले. आमदार, खासदार, नगरसेवक, खऱ्या शिवसेनेचे पदाधिकारी यांना विकत घेण्यासाठी आणि नंतर पोसण्यासाठी लागणारा पैसा रस्ते, बांधकाम ठेकेदार, एमएमआरडीए, एमएमआरडीसी, म्हाडा, एसआरए, नगरविकास खात्याची लूट करुनच जमा केला गेला. हा लुटीचा पैसा खिशात पडावा यासाठी अनेकांनी पक्षांतरे केली. पैशांचा हा प्रवाह आला कुठून? तर बेकायदेशी टेंडर्स, बनावट कामं, निधीवाटपातील कमिशनबाजी, भूखंड घोटाळे, गृहनिर्माणातील दलाली या आशर मार्गाने हा पैसा जमा झाला. शिंद्यांचे मुख्य कलेक्टर आशर प्रा. लि. हे दहा हजार कोटी रुपये घेऊन दुबईत पळाले आहेत अशी ताजी बातमी आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात घाण करणाऱ्या या सर्व गटारांची सफाई करण्याचे ठरवले आहे. ५०० कोटींचे टेंडर ३ हजार कोटींपर्यंत वाढवून मधले हजार कोटी काम होण्याआधीच ताब्यात घ्यायचे. त्यातले शे-दोनशे कोटी चेल्यांमध्ये वाटायचे आणि त्यांना प्रयागतिर्थी गंगास्नान घडवायचे. या कारनाम्यांना बूच लावण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलं आहे.” असं म्हणत सामनातून देवेंद्र फडणवीसांची स्तुती करण्यात आली आहे.

“फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणखी एक महत्त्वाचे काम केले. मंत्र्यांचे पीए आणि ओएसडी नेमण्याचे अधिकार काढून घेतले. जी नावं मंजुरीसाठी पाठवण्यात आली होती त्यातली १६ नावं फडणवीस यांनी नाकारली कारण हे १६ जण मंत्र्यांचे ओएसडी बनून दलाली, फिक्सिंग करत होते. हे सर्व फिक्स मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाकरले. फिक्सर नेमू देणार नाही ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका योग्य आहे. या १६ पैकी १२ फिक्स हे शिंदे गटाच्या मंत्र्यांनीच सुचवले होते असे आता समोर आले आहे. नीट काम करा नाहीतर घरी जाल असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याची कबुली मंत्री माणिक कोकाटे यांनी उघडपणे दिली. मंत्रालयात सामान्यांना प्रवेश मिळत नाही व दलालांचा सुळसुळाट असतो. पुन्हा मंत्र्यांचे पीए आणि ओएसडी हेच फिक्सर असल्याने या दलालांना मंत्र्यांना दालनापर्यंत सहज पोहचता येतं. शिंदे काळात तर मंत्रालय म्हणजे दलाल आणि फिक्सरांची जत्राच झाली होती. फ्रान्सच्या एका कंपनीने एमएमआरडीएवर कमिशन खोरीचा आरोप केला. मेट्रोच्या उभारणीत या कंपनीचा सहभाग आहे. या कंपनीने केलेल्या नियमित कामांची बिले मुद्दाम रखवडून ठेवली जात आहेत. आकाचे कमिशन मिळाल्याशिवाय बिलं मिळणार नाहीत हे परदेशी कंपन्यांना सांगितले जाते आहे. तीन वर्षांपूर्वी शिंदे यांचे राज्य फिक्सिंगमधूनच अवतरले. त्यामुळे राज्यात फिक्सर आणि दलाल यांचे उदंड पीक आले. हे पीक कापण्याचे सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवले आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. पण त्यांनी हाती घेतलेले कार्य सोपे नाही. कारण दाढीवाला खोडकिडा म्हणतोय मला हलक्यात घेऊ नका. फिक्सरांनी मारलेला सिक्सर अडवावा लागेल.” असं म्हणत सामनातून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करण्यात आलं आहे तर एकनाथ शिंदेंवर टीका करण्यात आली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close