नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिलासा; सिलेंडरच्या दरात मोठी कपात

मुंबई : आज १ एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट झाली आहे. तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत ४१ रुपयांची कपात जाहीर केली आहे.
आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
IOCL च्या संकेतस्थळानुसार, आता १९ किलो वजनाचा व्यावसायिक गॅस सिलिंडर मुंबईमध्ये १, ७१३.५०रूपयांना मिळणार आहे. तर दिल्लीमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आता १,७६२ रुपये इतकी आहे. कोलकात्यामध्ये १८६९.५०, चेन्नईमध्ये १९२१.५० रूपयांना सिलिंडर मिळेल. मागील काही महिन्यांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने कपात केली जात असल्याचे दिसत आहे. दरम्यान, आजपासून देशभरात तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत सुधारणा केली आहे.
एलपीजीच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी ठरवल्या जातात. जागतिक कच्च्या तेलाच्या दरातील चढ-उतार आणि इतर आर्थिक घटकांच्या आधारावर गॅसच्या किंमतीत बदल केला जात असतो. व्यावसायिक एलपीजीच्या दरांमध्ये वारंवार बदल होत असताना, घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजीच्या किमती स्थिर आहेत.
मार्च २०२५ मध्ये १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅसची किंमत १०० रुपयांनी कमी करण्यात आली होती. त्यानुसार, दिल्लीमध्ये ८०३, कोलकात्यात ८२९, मुंबईत ८०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ८१८.५० रुपयांना घरगुती गॅस सिलिंडर मिळत आहे.