
कराड : खंडणीसाठी गुंडाने रिक्षा चालकावर जीवघेणा हल्ला केला. शहरातील कोल्हापूर नाक्यावर असलेल्या महात्मा गांधी रिक्षा गेटजवळ बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत आरिफ हारून मुजावर (रा. कराड) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जुनेद रियाज मुजावर (रा. शिवाजी चौक, मलकापूर, कराड) असे गुन्हा दाखल झालेल्या गुंडाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात राहणारे आरिफ मुजावर हे रिक्षा चालक असून बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ते कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधी रिक्षा गेटजवळ थांबले होते. त्यावेळी जुनेद मुजावर त्याठिकाणी आला. मी या परिसराचा भाई आहे. मला सर्वांनी महिन्याला दोन हजार रुपये हप्ता द्यायचा, अशी दमदाटी त्याने केली. त्यावेळी आरिफ यांनी हप्ता देण्यास नकार दिला असता जुनेद याने शिवीगाळ, दमदाटी करीत मोठा दगड उचलून आरिफ यांच्या दिशेने भिरकावला. आरिफ यांनी तो दगड चुकवला. त्यानंतर जुनेदने दुसरा मोठा दगड उचलून पुन्हा एकदा आरिफ यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीही आरिफ यांनी तो दगड चुकवला. मात्र, चुकवलेला तो दगड रिक्षाच्या काचेवर लागून काच फुटली. आरडाओरडा झाल्यानंतर परिसरातील नागरिक त्याठिकाणी जमले. त्यामुळे जुनेद मुजावर तेथून निघून गेला. याबाबत आरिफ मुजावर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मगदूम तपास करीत आहेत.