
कराड : पोहायला शिकताना युवकाचा विहीरीत बुडून मृत्यू झाला. कोपर्डे हवेली, ता. कराड येथील चिमणकी नावच्या शिवारात शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
तन्मय तेजस पापर्डेकर (वय १७, रा. शिवाजी स्टेडीयम पाठीमागे, जाधव वस्ती, कराड) असे बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत ओंकार अशोक शिंदे (रा. जाधव वस्ती, कराड) याने कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील जाधव वस्तीत राहणारा तन्मय पापर्डेकर हा युवक कोपर्डे हवेली गावच्या हद्दीत चिमणकी नावच्या शिवारात असलेल्या विहीरीत पोहोयला शिकण्यासाठी गेला होता. पोहायला शिकता यावे, यासाठी त्याने सोबत टायरची ट्युब नेली होती. सुरूवातीला त्याने ती ट्युब विहीरीच्या पाण्यात टाकली. त्यानंतर विहीरीच्या काठावरुन त्याने त्या ट्युबवर उडी घेतली. त्यावेळी त्या ट्युबमधून तन्मय विहीरीच्या खोल पाण्यात बुडाला. बराचवेळ तो पाण्यातून बाहेर आला नाही. त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. हवालदार तायशेटे तपास करीत आहेत.