
कराड ः विद्यानगर-सैदापर येथील कॉलेज परिसरात पहाटेच्या सुमारास बाईकवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरीने हिसकावून पोबारा केलेल्या दोघांना कराड शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एक लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
केतन दिनेश जोशी (वय 24 रा. बनवडी ता. कराड) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर अन्य एक जण विधी संघर्ष बालक असल्याने त्याला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विद्यानगर-सैदापूर येथील कॉलेज परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरीने हिसकावून दोघांनी दुचाकीवरून पलायन केले होते. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, डीवायएसपी राजश्री पाटील, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी कराड शहरात पहाटे होणाऱ्या जबरी चोरी अनुषंगाने पथके तयार करून होणाऱ्या गुन्ह्यांना तात्काळ आळा घालून झालेल्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी यांनी विद्यानगर येथील झालेल्या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळवत संशयित हा बनवडी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी यांचे पथकाने सदर संशयितांचा शोध घेऊन त्याना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी असा एकूण एक लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. सदर गुन्ह्यातील संशयित केतन दिनेश जोशी याला अटक केली आहे. तर दुसरा विधी संघर्ष बालक असल्याने त्याला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, डीवायएसपी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी, पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम, पोलीस हवालदार अशोक वाडकर, सज्जन जगताप, कुलदीप कोळी, संतोष पाडळे, मुकेश मोरे, महेश शिंदे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, आकाश पाटील यांनी केली.