राजकियराज्यसातारा

कोयना बँकेच्या अध्यक्षपदी कृष्णत पाटील तर उपाध्यक्षपदी साहेबराव शेवाळे यांची निवड

कराड : कोयना सहकारी बँक लि, कराड या बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली असून बँकेच्या अध्यक्षपदी कृष्णत पाटील रा. काले तर उपाध्यक्षपदी साहेबराव शेवाळे रा कराड यांची संचालक मंडळाच्या विशेष सभेत एकमताने निवड करण्यात आली. सदर सभा श्रीमती अपर्णा यादव उपनिबंधक (सहकारी संस्था), कराड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या निवडीच्या निमित्ताने आयोजित सत्कार समारंभात नव्याने निवडून आलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार अ‍ॅड. उदयसिंह पाटील (उंडाळकर), श्रीमती अपर्णा यादव (उपनिबंधक), अदिराज पाटील (उंडाळकर), संचालक मंडळ  तसेच रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
समारंभात बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष कृष्णत पाटील म्हणाले, बँकेच्या कामकाजात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सभासदहित हे आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल. बँकेचे  संस्थापक अ‍ॅड. उदयसिंह पाटील (उंडाळकर) यांचे मार्गदर्शनाखाली बँकेची पुढील वाटचाल ही विकासाभिमुख आणि विश्वासार्हतेच्या अधिष्ठानावर आधारित आदर्शवत असेल तसेच आमचा प्रयत्न बँकेचा सामाजिक सहभाग वाढवण्याचा असेल अशी ग्वाही दिंली.
बँकेचे संस्थापक अ‍ॅड. उदयसिंह पाटील (उंडाळकर) यांनी आपल्या भाषणात  सहकार चळवळीच्या ऐतिहासिक वाटचालीवर भाष्य करत सांगितले की, स्व. लोकनेते विलासकाका पाटील (उंडाळकर) यांच्या  मार्गदर्शनाखाली सहकाराच्या व आर्थिक पारदर्शकतेच्या मुल्यांची जाणींव ठेवत कोयना बँकेने जी विश्वासार्हता निर्माण केली आहे, ती नव्या संचालक मंडळाने अधिक बळकट करावी. कोयना बँक, स्वा. सै. शामराव पाटील पतसंस्था, कोयना दूध संघ, कोयना सहकारी वाहतूक संस्था, कराड तालुका खरेदी-विक्री संघ, तसेच रयत सहकारी साखर कारखाना या संस्था आजही नावारूपास असूंन त्या संस्था म्हणजे ग्रामीण अर्थकारणाला दिशा देणाऱ्या प्रेरणास्थाने आहेत. कोयना बँकेची बिनविरोध निवड ही लोकशाही सहकार मूल्यांची जपणूक असल्याचे द्योतक आहे.
यानंतर युवानेते व बँकेचे संचालक अदिराज पाटील (उंडाळकर) यांनी आपल्या भाषणात विलासकाका पाटील यांचे कार्याची आठवण करून दिली. माझे आजोबा स्व. विलासकाका पाटील (उंडाळकर) यांनी सहकार, राजकारण आणि समाजकारण यांचे संगमशील कार्य घडवले, त्यांच्या कार्याची जाणीव माझ्या मनात सदैव जागी आहे. स्व. विलासकाका यांच्या विचारधारेनुसारच भविष्यात रयत संघटनेच्या माध्यमातून सुसंस्कृत, मूल्याधिष्ठित आणि समाजाभिमुख समाजकारणाला अधिक बळ देणे हा माझा प्रयत्न राहील. राजकीय प्रलोभने, आमिषे यामुळे सध्याची युवा पिढी भरकटलेली आहे त्यासाठी एक सुसंस्कृत युवा पिढी घडवण्यासाठी कटिबद्ध असून सहकार चळवळीतील नैतिकता, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांची ओळख तरुण पिढीला करून देऊन, त्यांना या रचनात्मक कार्यात सक्रिय सहभागी करून घेण्यावर भर दिला जाईल. जेणेकरून भविष्यातील नेतृत्वासाठी एक सुदृढ आणि जबाबदार पिढी तयार होईल.
कार्यक्रमास बँकेचे सर्व संचालक, विविध सहकारी संस्था प्रतिनिधी, रयत संघटनेचे कार्यकर्ते, सभासद व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close