
कराड : कापिल ता.कराड येथे रहिवासी नसलेल्या लोकांनी कापिल गावच्या पत्त्याचे बनावट आधार कार्ड तयार करून कापिल गावामध्ये मतदान नोंदणी करून मतदान केले. संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी गणेश पवार यांनी तहसील कार्यालयासमोर सात दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची दखल प्रशासनाने अद्याप घेतलेली नाही. दरम्यान बोगस मतदारांवर गुन्हा दाखल करण्यास निवडणूक प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप करू पुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा गणेश पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.
सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी कपिलमध्ये बनावट आधार कार्ड द्वारे मतदान नोंदणी झाल्याचे पुरावेद्वारे स्पष्ट केले आहे याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या मतदारावर गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी असून याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी हात झटकून रिकामे होत आहेत. याबाबत गणेश पवार यांनी कराड शहर पोलीस स्टेशनलाही गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. मात्र कराड शहर पोलिसांकडून हा विषय निवडणूक शाखेचा असल्यामुळे त्यांच्याकडून कोणीही कर्मचाऱ्यांनी येऊन कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा आम्ही तो गुन्हा दाखल करून घेऊ असे गणेश पवार यांना सांगण्यात आले आहे.
तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या नऊ मतदारांची नावे कमी करण्याबाबतचे आदेश दिलेले आहेत हे आदेश सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी प्रशासनाकडून घेतलेली आहे. मात्र आत्ताच दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने नवीन मतदार यादी प्रसिद्ध झाल्या. या याद्यांमध्ये त्या नऊ लोकांची नावे स्पष्टपणे दिसून येत आहे यावरून प्रशासनाचा किती भोंगळ कारभार आहे हे याद्वारे स्पष्ट होत आहे. जर या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या मतदार यादीत जर या नऊ लोकांची नावे आहेत तर या नऊ लोकांना मतदानापासून वंचित ठेवता येणार का? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. मागील झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जर मतदार यादीत नाव असेल तर त्यांना मतदानापासून कोणीही रोखू शकत नाही असे स्पष्टपणे सांगितले होते. जर तसे असेल तर आत्ता प्रसिद्ध झालेल्या याद्यांमध्येही त्या नऊ लोकांची नावे दिसून येत आहेत मग पुन्हा हे नऊ जण कापिल गावामध्ये येऊन मतदान करणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. जर प्रशासनाची ही मिली भगत असेल तर या प्रक्रियेत जे सामील आहेत त्या सर्वांवरती कारवाई व्हावी अन्यथा माझे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी दिला आहे.
मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कराड यांनी संबंधित मतदारांची पूर्वीच्या ठिकाणांची नावे कमी न करता कोणत्या कायद्याखाली कापिल येथे मतदार यादीत नावे वाढवली याची चौकशी व्हावी अशी मागणी पवार यांनी केली आहे. कराड शहर पोलिसांनी गणेश पवार यांना पत्र दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, बनावट कागदपत्र देऊन ज्या मतदारांनी निवडणूक प्रशासनाची फसवणूक केली आहे त्या प्रशासनातील कुठल्याही अधिकारी कर्मचाऱ्यांनी रितसर तक्रार दिली तर संबंधितांवर गुन्हे दाखल करता येतील. तर प्रांताधिकारी सांगत आहेत ज्यांनी हरकत आहे त्यांनी गुन्हे दाखल करावेत. याचा अर्थ निवडणूक अधिकारी खोटे बोलून दिशाभूल करत आहेत. बोगस मतदारांची कागदपत्र देऊन कशा पध्दतीने बोगस नोंद करून मतदान केले आहे याची पुरव्यासह माहिती दिली असतानाही निवडणूक प्रशासन संबंधित बोगस मतदारांवर गुन्हे दाखल करण्याबाबत टाळाटाळ करत आहे, असा आरोप गणेश पवार यांनी केला आहे. आंदोलनास काँग्रेससह विविध पक्ष, संघटनांनी पाठिंबा दिला आहे.