
कराड : केंद्रात व राज्यात मत चोरी करून भाजप सत्तेत आला आहे. सरकारच्या या मत चोरीचा खासदार राहुल गांधी यांनी वेळोवेळी पर्दाफाश केला आहे. मत चोरीबाबत राहुल गांधी देशपातळीवर जे मुद्दे मांडत आहेत तेच मुद्दे कराड तालुक्यातील कापिलचे गणेश पवार यांनी मांडले आहेत. बोगस मतदार सिद्ध झाल्यानंतरही त्यांच्याविरोधात कारवाई करीत नाही. त्यामुळे मत चोरीबाबत जिल्हा काँग्रेसच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी दिला आहे.
दरम्यान, गणेश पवार यांच्या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा देत आंदोलन स्थळी भेट दिली. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, अजितराव पाटील-चिखलीकर, इंद्रजित चव्हाण, प्रदीप जाधव, संजय तडाखे व कार्यकर्ते उपस्थित होते.
रणजितसिंह देशमुख म्हणाले की, केंद्र व राज्यातील सरकार मत चोरी करून सत्तेत आले आहे. खासदार राहुल गांधी देशपातळीवर पूर्ण ताकदीने मत चोरीचा मुद्दा मांडत आहेत. राज्यात जनता विधानसभा निवडणूक अद्याप विसरलेली नाही. पुराव्यानिशी तक्रार करूनही निवडणूक प्रशासन कोणतीही कारवाई करीत नाही. हीच परिस्थिती राज्य व देशात आहेत. त्यामुळे बोगस मतदारांविरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. 12 तारखेपासून बोगस मतदारांविरोधात काँग्रेसच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा रणजितसिंह देशमुख यांनी दिला आहे.