
कराड : श्री मळाईदेवी शिक्षण संस्था, श्री मळाईदेवी नागरी पतसंस्था, श्री मळाई ग्रुप यांचे मार्फत शेती मित्र श्री अशोकराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील( सीना) दारफळ आणि करमाळा तालुक्यातील तरडगाव, बोरगाव, बाळेवाडी इत्यादी गावांमध्ये पूरग्रस्त बाधितांना मदत पोहोचविण्यात आली.
समाजामध्ये कोणतेही भागामध्ये नैसर्गिक आपत्ती आल्यास आजूबाजूच्या भागातील लोकांनी संवेदनशीलतेने त्या भागास मदत पोहोचवली पाहिजे, या जाणिवेतून श्री मळाई ग्रुपने शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. त्यांच्याकडून होणाऱ्या खारीच्या वाट्यामध्ये भरीव मदत करून श्री मळाई नागरी पतसंस्थेने 570 अन्नधान्य किट व 800 साड्या आणि ब्लॅंकेट्स इत्यादी वस्तू पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविल्या. गहू, तांदूळ, ज्वारी, साखर, चहा पावडर, तेल, तिखट, खाकरा, शेंगदाणा चटणी, पाच प्रकारच्या डाळी, शेवया व दोन साड्या असे किट तयार करून गरजूंना वाटप करण्यात आले. संस्थेच्या मार्गदर्शक संचालिका डॉ. स्वाती थोरात यांच्या संकल्पनेतून आणि नियोजनातून ही मदत पोहोचवण्यात आली. श्री मळाई देवी नागरी पतसंस्थेचे चेअरमन श्री. अजितकाका थोरात, सर्व संचालक यांनी भरीव निधी उपलब्ध करून देऊन मोलाची मदत केली. श्री मळाई ग्रुप मधून आप्पासाहेब गरुड, शिवाजीराव धुमाळ, भीमराव माहूर, तुळशीराम शिर्के, पंजाबराव पाटील यांनीही या कामी मदत केली. पंढरपूर निमा संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अमरसिंह जमदाडे यांचे (सीना) दारफळ या गावांमध्ये तर अमरसिंह साळुंखे यांचे तरडगाव, बोरगाव, तालुका करमाळा या गावापर्यंत तळागाळापर्यंत मुदत पोहोचवण्यासाठी अनमोल सहकार्य लाभले.
Tags
Karad Malai group