
कराड : कापिल (ता.कराड) येथे विधानसभा निवडणूकीत परगावच्या 9 लोकांनी बोगस मतदान केले आहे. या सर्व प्रकरणाला कराडचे मतदान नोंदणी अधिकारी तथा प्रांत अतुल म्हेत्रे व संजय गांधी योजनेचे अव्वल कारकून युवराज पाटील जबाबदार आहेत. बोगस मतदारांवर कारवाई करायचे सोडून प्रशासन त्यांना वाचवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या व्यक्तींना मदत करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांत अधिकारी व संजय गांधी शाखेतील अव्वल कारकून यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी तसेच त्या 9 बोगस मतदारांविरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी बुधवार दि. 8 पासून प्रशासकीय कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा ईशारा गणेश पवार यांनी दिला आहे.
कापिल येथील बोगस मतदान व प्रशासनाच्या भोंगळ कारभाराची माहिती देण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गणेश पवार व कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सदस्य नितीन ढापरे उपस्थित होते. गणेश पवार म्हणाले की, कापिल गावचे ग्रामस्थ व मतदार नसलेल्या 9 लोकांनी विधानसभा निवडणूकीत मतदान केल्याची तक्रार करूनही कराडच्या निवडणूक विभागाने कारवाई केली नसल्याने सुमारे दोन महिन्यापुर्वी 9 दिवस आमरण उपोषण केले होते. त्यावेळी प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
यावर प्रांतांनी सदरच्या 9 लोकांची शहानिशा करून त्यांची नावे मतदार यादीतून कमी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला त्या लोकांना वाचवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या लोकांना पाठीशी घालण्याचे काम करण्यात आले आहे. ते 9 लोक कापिलचे रहिवाशी असल्याचे दाखवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने भाडेकरार व नोटरी करण्यात आल्या आहेत. यात अनेक त्रुटी आहेत. विषेश म्हणजे त्या त्रुटींसह चुकीच्या पद्धतीने केलेले भाडे करार व नोटरी निवडणूक विभागाने स्विकारल्या आहेत.
यापुर्वी आपण फक्त त्या बोगस मतदारांवर कारवाईची मागणी केली होती. मात्र आता त्यात मतदान नोंदणी अधिकारी व संजय गांधी शाखेचे अव्वल कारकून दोषी असल्याचे दिसून येत आहे. तर चुकीच्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे नोटरी व भाडेकरार केल्याने यात आणखी आरोपींची भर पडत आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी तसेच बनावट कागदपत्र तयार करणारांच्या विरोधातही पुढच्या टप्प्यात आंदोलन करण्यात येणार असल्याचे गणेश पवार म्हणाले.
युवराज पाटील यांची नेमणूक संजय गांधी शाखेमध्ये असताना ते निवडणूक विभागाचे काम करीत आहेत. संजय गांधी शाखेचे अव्वल कारकून युवराज पाटील यांना कोणताही आदेश नसताना ते निवडणूक शाखेमध्ये जवळपास 8 वर्षांपासून येथे काम करणाऱ्या युवराज पाटील यांना निलंबित करून खातेनिहाय चौकशी करण्याची मागणीही गणेश पवार यांनी केली आहे.
Tags
ganesh pawar Karad