
कराड : दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक लि., कराड बँकेच्या अध्यक्षपदी समीर सुभाषराव जोशी यांची तर उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.अध्यासी अधिकारी म्हणून संजयकुमार सुद्रिक, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा यांनी कामकाज पाहिले.
नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या सत्कार समारंभात अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी म्हणाले, सन 2022 पासून बँकेला सक्षम नेतृत्त्व देण्याच्या दृष्टीने मोठे बदल केले असून 12 नवीन संचालकांचा समावेश आणि बोर्ड ऑफ मॅनेजमेंटमध्ये फेरबदल केले होते. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची जबाबदारी संचालकांतील तरूण पिढीकडे सोपविण्याचा निर्णय डॉ. सुभाष एरम, मी आणि सर्व संचालकांनी सार्वमतान घेतला आहे. बँक व्यवसायाच्या एका महत्वाच्या टप्प्यावर पोहोचली असून लवकरच बँक रु.6000 कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण करेल. बँकिंगमध्ये सद्यस्थितीत होत असलेल्या आणि होऊ घातलेल्या बदलांशी सुसंगत असा आहे. त्यामुळे बँकेला भविष्य काळातील वाटचालीसाठी सक्षम नेतृत्त्व मिळेल.
व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी म्हणाले, संस्थाही वर्धिष्णु असते, संस्थेच्या व्यवस्थापनात अनेक बदल होत असतात आणि सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. गेल्या 22 वर्षात डॉ. सुभाष एरम यांनी दिलेले योगदान बँकेच्या इतिहासातील सुवर्णपान आहे. एरम कुटुंबीयांनी बँकेच्या वाटचालीत दिलेल्या योगदानाबद्दल आपण सर्वजण कृतज्ञ आहोत. व्यवस्थापनातील होणारा हा बदल बँकेच्या भविष्यकाळातील वाटचालीशी निगडीत आहे. यातून आपण बँकेला व्यवसायाच्या ऐतिहासिक टप्प्यावर नेण्याचे नियोजन साध्य करणार आहोत.
अध्यक्ष श्री. समीर जोशी म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या या कराड अर्बन बँकेत कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी व माजी अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सदृढता व सक्षमतेच्या आधारावरच आजपर्यंतची वाटचाल केलेली आहे. बँकेने घालून दिलेली कारभारातील पारदर्शता, राजकारणर हितता व निस्वार्थी कारभार या तत्वांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि सर्व संचालक मंडळाला विश्वासात घेवून यापुढील बँकेची वाटचाल कायम राहील अशी ग्वाही याप्रसंगी त्यांनी दिली.
उपाध्यक्ष श्री. शशांक पालकर म्हणाले, कराड अर्बन बँकेने आजपर्यंत केलेली वाटचाल प्रशंसनीय अशीच आहे. वैभवशाली बँकेच्या संचालक मंडळाने माझ्यावर जो विश्वास दाखवून मला काम करण्याची संधी दिली आहे. माझ्या ज्ञानाचाआणि जनसंपर्काचा जास्तीत जास्त फायदा बँकेला व्यवसायवाढीत कसा होईल, या दृष्टीने मी प्रयत्नशील राहणार आहे.
सत्कार समारंभास सर्व संचालक, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे, सेवक वर्ग तसेच सभासद, ग्राहक, हितचिंतकांची लक्षणीय उपस्थिती होती.
सध्या बँकींग रेग्युलेशन ॲक्ट, रिझर्व्ह बँकेचे नियम यामुळे सहकारी अर्थ वाहिन्यांमध्ये सभासदांचे प्रतिनिधी म्हणून काम करत असताना सतर्क व जागरूक राहण्याची नितांत गरज आहे. सन 2022 मध्ये झालेल्या संचालक मंडळ निवडीमध्ये जुन्या पाच संचालकांसह बारा नवीन संचालकांना संधी देण्यात आली होती. समाजकारणाबरोबर अर्थकारणामध्ये सक्रीय व सतर्क असणाऱ्या नवीन व्यक्तींचा समावेश संचालक मंडळात करण्यात आला असून भावी नेतृत्व विकास आराखड्याचाच हा एक भाग आहे आणि म्हणूनच सर्व संचालक मंडळाने एकमताने नवीन तरुण अध्यक्ष म्हणून समीर जोशी व उपाध्यक्ष म्हणून शशांक पालकर यांची निवड केलेली आहे. बिनविरोध निवड झालेल्या नवनिर्वाचीत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.
– डॉ. सुभाष एरम, (माजी अध्यक्ष, कराड अर्बन बँक, कराड)