
शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजता सुरू झालेला हा संगीत सोहळा शनिवारी रात्री बारा वाजता, म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या मध्यरात्री संपन्न झाला. अखंड २४ तास अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांतील गाणी, संवाद, चित्रपटगोष्टी आणि उत्सवाचा माहोल यामुळे कराड शहर संगीताच्या सुरांनी दुमदुमले.सामान्यातील असामान्य कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळाल्याच्या भावना कलाकारांनी व्यक्त केल्या. या विक्रमी कार्यक्रमात कराड तसेच सातारा, सांगली जिल्ह्यातील १२५ हून अधिक कलाकारांनी सहभाग घेतला. त्यांनी अडीचशेहून अधिक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांतील गाणी सादर केली. पंकज एक्झिक्युटिव्ह हॉटेलच्या ए.सी. हॉलमध्ये रंगलेल्या या सोहळ्याला हजारो संगीतप्रेमी उपस्थित राहिले.
दुपारी पुन्हा एकदा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमासाठी प्रायोजक असणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर ‘साज और आवाज’, ‘स्वरसाधना ग्रुप’, ‘कराओके सिंगिंग क्लब कराड’, तसेच शहरातील जुना आणि ख्यातनाम ‘मोहम्मद रफी सिंगिंग क्लब’ यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. सायंकाळी ‘कंपा अकॅडमी’, ‘किशोर कुमार फॅन क्लब’ आणि ‘स्वरसंस्कार संगीत अकॅडमी’च्या कलाकारांनी गाण्यांची मालिका सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
रात्री अकरानंतर दिवसभरातील टॉप सहा गायकांनी आपल्या गायनाने कार्यक्रमाची उंची आणखी वाढवली. मध्यरात्री पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस साजरा करून कार्यक्रमाची सांगता झाली. या संगीत महोत्सवाच्या समांतर कला प्राध्यापक सतीश उपळावीकर यांनी आणखी एक विक्रम प्रस्थापित केला. अमिताभ बच्चन यांच्या जीवनावर आधारित ८३ फुट उंचीच्या कॅनव्हास पेंटिंगचे त्यांनी २४ तास अखंड रेखाटन केले. एकीकडे 24 तास गाणी तर दुसरीकडे 83 फुटाचा कॅनव्हास पेंटिंग असा उपक्रम देशात पहिल्यांदाच पार पडला असून, ही माहिती अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या कार्यक्रमाला शहरातील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन अभिनंदन केले. माजी खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, “हा उपक्रम जया बच्चन यांच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत निश्चित पोहोचवण्यात येईल. कराडमध्ये अशा संगीतप्रेमींची परंपरा जपली जावी, हीच आमची इच्छा.”
माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनीही बच्चनप्रेमींच्या प्रयत्नांचे कौतुक करताना म्हटले, “अमिताभ बच्चन यांसारखा कलाकार अभिनय जगतात क्वचितच जन्माला येतो. कराडकरांनी साकारलेला हा सोहळा खरंच स्तुत्य आहे.” कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष समीर जोशी, तसेच माजी नगरसेवक सौरभ पाटील, जशराज पाटील,स्मिता हुलवान, इंद्रजीत चव्हाण, चैतन्य कणसे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
24 तास ऑनलाइन राहणाऱ्या या पकाळात अमिताभ बच्चन प्रेमीनी राबवलेल्या या उपक्रमात उपस्थित रसिकांनी या कालावधीत मोबाईल बाजूला ठेवला आणि संगीताचा आनंद घेतला, हे या कार्यक्रमाचे यश असल्याचे असल्याची प्रतिक्रिया वाहन निरीक्षक चैतन्य कणसे यांनी व्यक्त केली
‘अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप’ गेल्या दहा वर्षांपासून कराडमध्ये कार्यरत असून, दरवर्षी बच्चन यांच्या वाढ दिवसानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. यंदाच्या विक्रमी सोहळ्याचे नियोजन संस्थापक अध्यक्ष सतीश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सतीश भोंगळे, जगन पुरोहित, जॉन्टी थोरात, डॉ. नितीन जाधव, अतुल शिंदे, बंडा पाटील, सुधीर एकांडे,शेरखान पठाण, प्रमोद गरगटे, संजय शिरसागर,बाळासाहेब पाटील,अतुल शिंदे आणि विजय वाटेगावकर या सर्व सदस्यांनी या उपक्रमासाठी अथक परिश्रम घेतले.
या २४ तास चाललेल्या अखंड संगीत सोहळ्याने कराड शहरात संगीत आणि बच्चनप्रेमाची नवी परंपरा निर्माण केली आहे. अमिताभ बच्चन यांच्या गीतांनी आणि अभिनयाच्या आठवणींनी भारावलेल्या कराडकरांच्या या उपक्रमाची नोंद आता थेट महानायकांपर्यंत होणार आहे — आणि तो क्षण संपूर्ण कराडसाठी अभिमानाचा ठरणार आहे.
‘मुकद्दर का सिकंदर अभिमान पत्र’ने कलाकारांचा गौरव
या भव्य कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व कलाकारांना आणि संगीतप्रेमी ग्रुपना ‘अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप, कराड’ तर्फे ‘मुकद्दर का सिकंदर अभिमान पत्र’ देऊन गौरविण्यात आले.
अत्यंत आकर्षक आणि वेगळ्या पद्धतीने तयार केलेले हे प्रशस्तीपत्रक सर्वांच्या मनाला भावले. या प्रमाणपत्रावर अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचा प्रवास, त्यांच्या अभिनयाची झलक आणि बच्चनप्रेमींनी व्यक्त केलेले आदरभाव प्रतिबिंबित होत होते. सर्व गायक-गायिका आणि कराओके ग्रुपच्या प्रतिनिधींना हे प्रमाणपत्र देताना सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अशा प्रकारचा संगीत महोत्सव दरवर्षी आयोजित करावा, अशी मनोगते व्यक्त केली.
अमिताभ बच्चन चित्रांनी सजलेले सभागृह
पंकज एक्झिक्युटिव्ह हॉटेलचा ए.सी. हॉल त्या दिवशी पूर्णपणे अमिताभ बच्चनमय झाला होता. सभागृहातील प्रत्येक कोपरा त्यांच्या चित्रपटांच्या झळाळीने उजळून निघाला होता. व्यासपीठावरील बॅकड्रॉपवर बच्चन यांच्या विविध चित्रपटांतील प्रसिद्ध भूमिका आणि गाण्यांच्या दृश्यांचे फोटो लावण्यात आले होते. ‘गाण्यांचा अमिताभ’ हा कन्सेप्ट लक्षात घेऊन, ज्यात बच्चन यांनी स्वतः गायकाच्या भूमिकेत काम केले आहे अशा चित्रपटांतील त्यांच्या छायाचित्रांना विशेष स्थान देण्यात आले. सभागृहाच्या भिंतींवर, स्तंभांवर आणि प्रवेशद्वारावर त्यांच्या विविध चित्रपटांतील भावमुद्रांचे फोटो आकर्षक पद्धतीने सजवले होते. ‘दीवार’, ‘शोले’, ‘डॉन’,शराबी ‘सिलसिला’, ‘अग्निपथ’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘कभी कभी’ अशा चित्रपटातील दृश्यांचे कट-आऊट्स संपूर्ण सभागृहात उभारण्यात आले होते. विशेष म्हणजे, दिवसभरात अनेक रसिक आणि कलाकारांनी या सजावटीत सेल्फी पॉइंट्सवर फोटो काढत आठवणी जपल्या.