राज्यसातारा

222 पोत्यावरती शासकीय ओळखचिन्हच नाही? पुरावे नसताना शासकीय धान्य ठरवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न ? (भाग – तिसरा)

कराड : वाखाण परिसरातील धान्य गोदामावर झालेल्या कारवाईनंतर जप्त करण्यात आलेल्या २२२ पोत्यांच्या प्रकरणाने आता केवळ प्रशासकीय चौकशीपुरते मर्यादित न राहता, समाजाच्या अंतःकरणाला भिडणारा प्रश्न निर्माण केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या धान्यावर कोणताही ठोस शासकीय शिक्का, कोड नंबर किंवा ओळखचिन्ह आढळून न आल्याची बाब समोर येत आहे. हीच बाब आता सर्वात मोठा व गंभीर प्रश्न बनली असून, “हे धान्य खरोखरच शासकीय आहे का?” हा प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात घर करून बसला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शासनाकडून सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत वितरित होणारे धान्य हे नेहमीच अधिकृत गोणपाट (बारदान) पोत्यांमध्येच साठवलेले असते आणि त्या प्रत्येक पोत्यावर शासकीय शिक्का स्पष्टपणे उमटवलेला असतो. मात्र, या कारवाईत जप्त करण्यात आलेले बहुतांश धान्य प्लॅस्टिकच्या पोत्यांमध्ये आढळून आले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे, या पोत्यांवर शासकीय शिक्का नसताना ते धान्य “शासकीय” असल्याचा दावा करण्यामागे कोणते पुरावे आहेत, हा प्रश्न अधिकच तीव्र बनत आहे. गरीबांच्या ताटात जाणारे धान्य जर अशा संशयाच्या भोवऱ्यात सापडत असेल, तर ही केवळ एक प्रशासकीय चूक नसून समाजाच्या न्यायव्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत करणारी घटना ठरते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जप्तीच्या पंचनाम्यामध्येही शासकीय बारदान किंवा शिक्क्यांचा स्पष्ट उल्लेख नसल्याची चर्चा रंगत आहे. जर हे सत्य असेल, तर ही कारवाई केवळ प्रक्रियात्मक त्रुटी नसून कायद्याच्या मूलभूत तत्वांनाच आव्हान देणारी ठरते. कारण, कोणत्याही वस्तूला शासकीय घोषित करण्यासाठी तिच्यावर अधिकृत शिक्का, नोंदी व वितरण साखळीचे पुरावे असणे अत्यावश्यक असते. अन्यथा, ही कारवाई केवळ संशयावर आधारित असल्याचा आक्षेप घेण्यास वाव निर्माण होतो.

या संपूर्ण प्रकरणात सर्वात वेदनादायक बाब म्हणजे, हे धान्य ज्यासाठी आहे ते गरीब व गरजू कुटुंब… त्यांच्या ताटातील प्रत्येक कण हा त्यांच्या जगण्याचा आधार असतो. अशा वेळी, जर शासकीय धान्याच्या नावाखाली काहीतरी वेगळेच चित्र समोर येत असेल, तर ती केवळ चौकशीची बाब राहत नाही, तर ती एका गरीबाच्या हक्कावर झालेल्या संभाव्य अन्यायाची कहाणी बनते. शासकीय शिक्का नसलेली पोती आणि संशयास्पद जप्ती… या सगळ्याचा थेट परिणाम त्या कुटुंबांवर होतो, ज्यांच्यासाठी हे धान्य जीवनरेषा आहे.

कायद्याच्या चौकटीत पाहता, कोणतीही जप्ती ही ठोस पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि अधिकृत नोंदी यांच्या आधारेच केली जाणे अपेक्षित असते. परंतु, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अनेक महत्त्वाचे दुवे अद्याप अस्पष्ट आहेत. त्यामुळे, ही कारवाई कितपत कायदेशीर व टिकाऊ आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एकूणच, वाखाण येथील ही कारवाई आता केवळ २२२ पोत्यांची गोष्ट राहिलेली नाही, तर ती गरीबांच्या हक्काची, प्रशासनाच्या जबाबदारीची आणि न्यायाच्या मूलभूत तत्वांची कसोटी बनली आहे. सत्य काय आहे, हे शोधण्यासाठी आता केवळ कागदी चौकशी पुरेशी नाही, तर निष्पक्ष, पारदर्शक व उच्चस्तरीय तपास होणे अत्यावश्यक आहे. कारण, शेवटी प्रश्न फक्त पोत्यांचा नाही… तर त्या प्रत्येक पोत्यामागे असलेल्या एका गरीब कुटुंबाच्या जगण्याचा आहे.

पुढील भागात – वाखाण रोड परिसरात झालेली धान्यावरील कारवाई, जप्त केलेल्या धान्याचा उगम शोधण्याचे प्रशासनासमोर आव्हान?

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close