राज्यसातारा

आमदार अतुल भोसले यांच्या कार्यकाळात होणाऱ्या कामाचा दर्जा उत्कृष्ट असावा (भाग 23 वा)

कराड : कराड दक्षिण मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास मनात ठेवून, जनतेशी जुळलेली नाळ जपत आमदार अतुल भोसले यांनी आमदारकीच्या आधी दिलेली आश्वासने केवळ शब्दांपुरती न ठेवता ती प्रत्यक्षात उतरवण्याचा धडाडीचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. रस्त्यांच्या प्रश्नामुळे त्रस्त झालेल्या गावागावातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी त्यांनी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणला आहे. हा निधी म्हणजे केवळ आर्थिक तरतूद नसून, जनतेच्या विश्वासाला दिलेले उत्तर आहे. आमदार होण्यापूर्वी “रस्ते दर्जेदार आणि टिकाऊ करू” असे दिलेले वचन आता प्रत्यक्ष कामांच्या रूपाने पूर्ण होताना दिसत आहे.

या निधीच्या माध्यमातून प्रत्येक गावातील रस्त्यांचे काम सुरू होत असताना, त्या कामाची गुणवत्ता टिकवणे ही तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे. अतुल बाबांनी जनतेसमोर ठेवलेले स्वप्न केवळ निधी मिळवण्यापुरते मर्यादित नसून, त्या निधीतून उत्कृष्ट दर्जाचे काम व्हावे, गावागावातील नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ प्रवास मिळावा, ही त्यांची खरी भूमिका आहे. त्यामुळे स्थानिक नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनीही आपल्या गावातील कामांवर बारकाईने लक्ष ठेवून, आमदारांनी दाखवलेल्या विकासाच्या मार्गाला बळ देणे आवश्यक आहे.

परंतु वास्तवात काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्टदार व अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या निष्काळजीपणामुळे या चांगल्या उपक्रमाला गालबोट लागण्याची शक्यता निर्माण होत आहे. आमदारकीपूर्वी जनतेच्या डोळ्यात आशा निर्माण करणारे अतुल भोसले आज त्या आश्वासनांची पूर्तता करत असताना, काही ठिकाणी कामांमध्ये निकृष्ट दर्जा, वेळेचे उल्लंघन आणि नियमांची पायमल्ली दिसून येत आहे. ही बाब केवळ विकासाला अडथळा नसून, जनतेच्या विश्वासाशी केलेला विश्वासघात आहे.

“निधी आणायचा आमदाराने आणि तो उधळायचा काहींच्या मनमानीमुळे” अशी परिस्थिती किती दिवस सहन करायची, हा प्रश्न आता सामान्य जनतेच्या मनात निर्माण होत आहे. शासनाने दिलेल्या निधीचा योग्य वापर होणे ही प्रत्येक संबंधित यंत्रणेची जबाबदारी आहे. मात्र, काही ठिकाणी स्वतःचे खिसे भरण्याच्या उद्देशाने कामांची गुणवत्ता जाणीवपूर्वक कमी ठेवली जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. अशा प्रकारांना वेळीच आळा बसणे गरजेचे आहे.

अतुल बाबांनी आमदार होण्याआधी जनतेला दिलेली प्रत्येक हमी पूर्ण करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळवून देण्यासाठी प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टदार यांनीही तितक्याच प्रामाणिकपणे काम करणे अपेक्षित आहे. विकासाच्या या प्रवासात कोणत्याही प्रकारची तडजोड सहन केली जाणार नाही, हा स्पष्ट संदेश आता देण्याची वेळ आली आहे.

आज गरज आहे ती जनतेने सजग होण्याची आणि प्रत्येक कामावर लक्ष ठेवण्याची. कारण हा निधी म्हणजे जनतेच्या हक्काचा आहे, आणि त्या हक्कावर कुणीही डल्ला मारू नये. आमदार अतुल भोसले यांनी सुरू केलेल्या विकासाच्या या लढ्यात प्रत्येक नागरिक, कार्यकर्ता आणि जबाबदार अधिकारी यांनी एकत्र येऊन काम केल्यासच कराड दक्षिणचा चेहरा खऱ्या अर्थाने बदलू शकतो.

पुढील भागात – कापिल गावातील झालेल्या चुकीच्या कामाबाबत तक्रार दाखल होणार

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close