
कराड ः मुंढे, ता. कराड येथील खुनप्रकरणातील सहा आरोपींची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना गुरूवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या कोठडीत वाढ करीत न्यायालयाने त्यांना आणखी तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, या गुन्ह्यात वापरलेले दांडके, प्लास्टिक पाईप व पट्टा पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. या गुन्ह्यात आणखी काहीजणांचा सहभाग निष्पन्न होत असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
अजित आनंदा सावंत (वय 36), निवास आनंदा सावंत (45), सुधीर खाशाबा सावंत (41), स्मिता संदीप सावंत (28, सर्व रा. मुंढे), विनोद विश्वास माने (रा. आकाईचीवाडी) व विनायक गोविंद पवार (रा. पवारवाडी, नांदगाव) अशी पोलीस कोठडी सुनावलेल्यांची नावे आहेत.
खराडे येथील करण बर्गे या युवकाचा 20 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास मुंढे येथे मारहाण करुन खून करण्यात आला होता. तसेच मारहाण केल्यानंतर त्याच्याच मोबाईलवर त्याचे मारहाणीचे फोटो स्टेटसला ठेवण्यात आले होते. सोशल मीडिया स्टेटस पाहुनच करणला मारहाण झाल्याचे नातेवाईकांना समजले. त्यामुळे नातेवाईकांनी मुंढे येथे धाव घेवून करणला कृष्णा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. या खुनप्रकरणी रविवारी वारुंजी येथून चार आरोपींना ताब्यात घेवून अटक करण्यात आले होते. तर सोमवारी पहाटे विनोद माने व विनायक पवार या दोघांना अटक करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अझरूद्दीन शेख करीत आहेत.
Tags
crime news Karad Satara