साप्ताहिक विश्व सिटी न्यूज च्या दणक्याने प्रशासन खडबडून जागे
सेतू केंद्रामध्ये होणारी लूट थांबली : सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांकडून आभार व्यक्त

कराड : कराड तहसील कार्यालयातील सेतू केंद्रामध्ये आजपर्यंत लोकांकडून ज्यादा रकमेची वसुली करत ठेकेदाराने आपले उकळ पांढरे केले. मात्र या सर्वसामान्य विद्यार्थी आणि नागरिकांच्या प्रश्नावर साप्ताहिक विश्व सिटी न्यूजने आवाज उठवला आणि त्या बातमीची दखल तहसीलदार मॅडम कल्पना ढवळे यांनी तात्काळ घेऊन सेतू केंद्रामध्ये अमानुषपणे चाललेली लुबाडणूक थांबवण्याचे सांगितले. सेतू केंद्रामध्ये प्रतिज्ञापत्रासाठी व उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी ज्यादा रक्कम घेतली जात होती. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे गोरगरीब जनतेचे अतोनात नुकसान होत होते. आणि ठेकेदार मालामाल होत होते. याबाबत कोणीही आवाज उठवायला तयार नव्हते. मात्र, साप्ताहिक विश्व सिटी न्यूजने एकच बातमी लावली आणि प्रशासन खडबडून जागे झाले आणि तात्काळ त्याच दिवशी सेतू केंद्रामध्ये प्रतिज्ञा पत्राचा व दाखल्यांचा दर जेवढा आहे तेवढेच पैसे विद्यार्थी आणि सर्वसामान्य कडून घेतले जाऊ लागले.
तसेच याबाबत सामाजिक कार्यकर्ते यांनी सुद्धा तहसील कार्यालयातील सेतू केंद्राने प्रतिज्ञापत्रासाठी व उत्पन्नाच्या दाखल्यासाठी नियमानुसार सेतू केंद्राने किती रक्कम घेतली पाहिजे याबाबत लेखी अर्ज करून विचारणा केली होती. या केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने तहसील कार्यालयातून प्रतिज्ञापत्रासाठी व उत्पन्नाच्या दाखल्यासाठी 33.60 ( 33 रुपये 60 पैसे) अशी रक्कम घेऊन ऑनलाईन पद्धतीची पावती दिली जाते असे लेखी उत्तर दिलेले आहे.
तसेच सेतू ठेकेदार व सचिव जिल्हा समिती तथा उपजिल्हाधिकारी महसूल यांच्यामध्ये झालेल्या करारामध्ये सेतू ठेकेदार यांनी सेतू शुल्क म्हणून 16 रुपये 40 पैसे अथवा 20 रुपये घेण्याबाबतचा कुठेही उल्लेख केल्याचे दिसून येत नाही. अशी वस्तुस्थिती असताना तहसील कार्यालयातील सेतू केंद्रामधून उत्पन्नाच्या दाखल्यासाठी व प्रतिज्ञापत्रासाठी 33 रुपये 60 पैसे न घेता 50 रुपये घेतले जातात व त्या रकमेची शासकीय पद्धतीची ऑनलाईन पावती न देता सेतू ठेकेदार यांनी तयार केलेल्या सॉफ्टवेअरची पावती दिली जात होती.
अशी वस्तुस्थिती असताना ठेकेदार यांनी मनमानी पद्धतीने सामान्य लोकांची फसवणूक करून ज्यादा रक्कम घेत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे माननीय तहसीलदार , नायब तहसीलदार यांनी यामध्ये लक्ष घालून सेतू ठेकेदार याला तात्काळ कार्यालय मध्ये बोलवून शासनाने निश्चित केलेली 33 रुपये 60 पैसे एवढीच रक्कम घेऊन ऑनलाईन पद्धतीचे पावती देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या सेतू केंद्रामध्ये 33 रुपये 60 पैसे घेऊन ऑनलाईन पद्धतीची पावती देण्याचे काम दिनांक 20/12/2024 पासून चालू केले आहे.
तसेच कराड तालुक्यातील लोकांनी प्रतिज्ञापत्र अथवा उत्पन्नाचे दाखले काढायचे असल्यास सेतू कार्यालयामध्ये 33 रुपये 60 पैसे एवढीच रक्कम द्यावी व नॉन क्रिमिनल चे दाखले काढायचे असतील तर 57 रुपये 60 पैसे एवढीच रक्कम देऊन ऑनलाईन पद्धतीची पावती घ्यावी.
या सेतू केंद्रा मधून होणारी लूट थांबवण्यासाठी साप्ताहिक विश्व सिटी न्यूजने आवाज उठवल्याबद्दल विद्यार्थी व नागरिकांकडून साप्ताहिक विश्व सिटी न्यूजचे आभार मानण्यात आले आहेत.