
कराड ः अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये आरोपीस सहा महिने सक्त मजुरी व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. के. एस. होरे यांनी ही शिक्षा ठोठावली.
प्रवीण अरूण चव्हाण (वय 24, रा. सह्याद्री हॉस्पिटल मागे, वारूंजी ता. कराड) असे शिक्षा मिळालेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत सरकार पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवीण चव्हाण याने अल्पवयीन मुलीशी तुझ्याशी मैत्री करायची आहे. तू मला आवडतेस असे म्हणून स्नॅपचॅट वर हाताचे मनगटाजवळ कापलेले फोटो पाठवून तिला भिती दाखवून स्वतःचे जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी दिली. व मुलीचे मोबाईल वरती काढलेले फोटो स्क्रीनशॉट मारून लज्जा उत्पन्न करणारे स्क्रीन शॉट ठेवून वायरल करण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी कराड शहर पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यावरून प्रवीण चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील आर. डी. परमाज यांनी युक्तीवाद केला. सरकार पक्षाचा युक्तिवाद, सादर करण्यात आलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी प्रवीण चव्हाण याला सहा महिने सक्त मजुरी आणि दहा हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षाला पोलीस हवालदार एस. व्ही. खिलारे यांनी सहकार्य केले.
Tags
crime news Karad Satara